For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दिल्लीत युपीएससीच्या 3 विद्यार्थ्यांच्या मृत्यूमुळे संताप

06:27 AM Jul 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
दिल्लीत युपीएससीच्या 3 विद्यार्थ्यांच्या मृत्यूमुळे संताप
Advertisement

कोचिंग इन्स्टीट्यूटच्या मालक-समन्वयकाला अटक : आप सरकारवर चहुबाजूने टीका

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

दिल्लीच्या ओल्ड राजेंद्र नगर भागात अतिवृष्टीनंतर राव आयएएस कोचिंग सेंटरच्या इमारतीच्या तळघरात पाणी भरल्याने तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. हे तिन्ही विद्यार्थी लोकसेवा परीक्षेची तयारी करत होते. तळघरातून तिघांचे मृतदेह हस्तगत करण्यात आली असून त्यांची ओळखही पटल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. या घटनेनंतर विद्यार्थ्यांनी संतप्त होत निदर्शने केली तसेच आम आदमी पक्षाच्या सरकारच्या विरोधात संताप व्यक्त केला आहे. तर भाजप आणि काँग्रेसने देखील या घटनेकरता आप सरकार जबाबदार असल्याचा आरोप केला आहे.

Advertisement

तानिया सोनी (तेलंगणा), श्रेया यादव (उत्तरप्रदेश) आणि नेविन डालविन (केरळ) या मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत. शनिवारी रात्री 7 वाजता  कोचिंग सेंटरमध्ये पाणी भरल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली होती. पूर्ण तळघरात पाणी कसे भरले याची आता चौकशी केली जात आहे.

दिल्ली पोलिसांनी कोचिंग सेंटरचा मालक आणि समन्वयकाला अटक केली आहे. भारतीय न्याय संहितेचे कलम 105, 106 (1), 115 (2), 290 आणि कलम 35 अंतर्गत एफआयआर नोंदविण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तळघरात एक वाचनालय होते, जेथे सुमारे 30-35 विद्यार्थी उपस्थित होते. तळघरात मोठ्या प्रमाणात पाणी भरले होते आणि तेथून विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी दोरखंडाचा वापर करण्यात आला. तळघरात पाणी भरल्याने तेथील फर्निचर तरंगू लागले, यामुळे बचावकार्यात अडथळे निर्माण झाल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. तर दिल्ली सरकारमध्ये मंत्री असलेल्या आतिशी यांना या घटनेप्रकरणी न्यायदंडाधिकाऱ्यांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

विद्यार्थ्यांकडून निदर्शने

विद्यार्थ्यांनी अधिकारी तसेच दिल्ली सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. विद्यार्थ्यांनी दिल्ली महापालिकेवर घोर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. तर भाजपने याप्रकरणी दिल्लीतील सत्तारुढ आम आदमी पक्षाला जबाबदार ठरविले आहे.  भाजप प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेव आणि खासदार बांसुरी स्वराज यांनी घटनास्थळाला भेट दिली. या दुर्घटनेसाठी दिल्ली सरकारचा गुन्हेगारी निष्काळजीपणा जबाबदार आहे. जल बोर्डमंत्री आतिशी आणि स्थानिक आमदार दुर्गेश पाठक यांनी याची जबाबदारी स्वीकारत स्वत:च्या पदांचा राजीनामा द्यावा अशी मागणी सचदेव यांनी केली. विद्यार्थ्यांना वाचविण्यासाठी पाणबुड्यांना  पाचारण करावे लागले. मागील एक आठवड्यापासून स्थानिक लोक आमदार पाठक  यांच्याकडे नालेसफाई करविण्याची मागणी करत होते. परंतु पाठक यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. या दुर्घटनेसाठी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, दुर्गेश पाठक आणि आप सरकार जबाबदार असल्याचा आरोप बांसुरी यांनी केला.

आपकडून प्रत्युत्तर

दिल्लीच्या अनेक ठिकाळी तळघरांना वाचनालयाचे स्वरुप देण्यात आले आहे. हा प्रकार गैर असल्याने यावर कारवाई व्हावी. याप्रकरणी जबाबदार असलेल्या व्यक्तींच्या विरोधात ठोस कारवाई करण्यात यावी. जोपर्यंत कोचिंग इन्स्टीट्यूट विरोधात कारवाई होणार नाही तोवर काहीच सुधारणा होणार नाही. दिल्लीचे ड्रेनेज सिस्टीम खराब आहे. 15 वर्षांपासून भाजप महापालिकेवर सत्तेवर होता. परंतु मी राजकारण करू इच्छित नाही असे प्रत्युत्तर आप आमदार दुर्गेश पाठक यांनी दिले आहे.

ही हत्याच : स्वाति मालिवाल

आप खासदार स्वाति मालिवाल यांनीही घटनास्थळाची पाहणी केली. हा थेट स्वरुपात हत्येचा प्रकार आहे. याप्रकरणी जबाबदार असलेल्या लोकांच्या विरोधात कठोर कारवाई व्हावी. ज्या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला, त्यांच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपयांची भरपाई मिळावी. आप महापौर आणि नगरसेवकांनी स्वत:च्या जबाबदारीकडे दुर्लक्ष केल्यानेच ही दुर्घटना घडली असल्याचा आरोप मालिवाल यांनी केला.

दिल्लीत कुशासनाचा मोठा संकेत

दिल्लीत सांडपाणी अन् नाल्यांमधील पाणी वाहून नेण्याची व्यवस्थाच कोलमडून पडली आहे.  मागील एक दशकामधील दिल्लीतील कुशासनाच्या मोठ्या आजाराचा हा संकेत आहे. कोचिंग इन्स्टीट्यूट आणि इमारत मालकांच्या भूमिकेची चौकशी केली जावी. कारण ते प्रचंड फी आणि भाडे भरणाऱ्या विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा देखील पुरवित नसल्याचे उपराज्यपाल सक्सेना यांनी म्हटले आहे.

व्यवस्थाच कोलमडलीय : राहुल गांधी

दिल्लीच्या एका इमारतीच्या तळघरात पाणी भरल्याने विद्यार्थ्यांचा मृत्यू अत्यंत दुर्दैवी आहे. काही दिवसांपूर्वी पावसादरम्यान वीजेचा झटका बसल्याने एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता. व्यवस्थाच कोलमडल्याचे यातून स्पष्ट होते. संस्थांच्या बेजबाबदारपणाची किंमत सामान्य नागरिक स्वत:चे आयुष्य गमावून फेडत आहे. सुरक्षित आणि सुविधानजक जीवन प्रत्येक नागरिकाचा अधिकार आणि सरकारांची जबाबदारी असल्याचे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

Advertisement
Tags :

.