हातावरच्या राख्या काढण्यास सांगितल्याने कुंकळीत संताप
बजरंग दलाने मुख्याध्यापकांना विचारला जाब
मडगाव : बहिण-भावाच्या पवित्र नात्याची महती सांगणारा सण म्हणजे रक्षाबंधन. गोव्यातील बऱ्याच शाळांनी हा सण अत्यंत उत्साही वातावरणात साजरा केला जातोय. मात्र, कुंकळळी येथील एका शाळेत विद्यार्थ्यांना हाताला बांधलेल्या राख्या काढण्यास सांगण्याचा प्रकार घडल्याने तीव नाराजीचा सूर व्यक्त झाला. हे प्रकरण बजरंग दलापर्यंत गेल्याने बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी शाळेला भेट देऊन मुख्याध्यापकाला जाब विचारला. यावेळी मुख्याध्यापकाने मुलांना राखी ठेवण्यासाठी सात दिवसांची मुदत दिल्याचे बजरंग दलाचे कार्यकर्ते विराज देसाई यांना सांगितले. मात्र, अशी मुदत घालणे उचित नसून शिक्षण खात्याने याप्रकरणी दखल घेऊन चौकशी करावी व स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी त्यांनी केली आहे.
राखी बांधल्यास लक्ष होते विचलित?
विराज देसाई यांनी हायस्कूलच्या मुख्याध्यापकांची भेट घेतली असता, त्यांनी सांगितले की, मुलांनी हाताला राखी बांधल्यास त्यांचे अभ्यासात लक्ष लागत नाही. ते विचलित होतात. त्यामुळे मुलांना राखी बांधण्यासाठी आठवड्याभराचा वेळ देण्यात आलेला आहे. मात्र, राज्यातील इतर शाळांनी मुलांना राखी काढण्यासाठी मुदत दिली जात नाही. मुलांना हवे तेव्हढे दिवस राखी ठेवण्याची मूभा दिलेली असते. मात्र, याच शाळेत हा अजब प्रकार का असा सवाल ही त्यांनी उपस्थित केला आहे. या प्रकरणी बजरंग दलाचे विराज देसाई यांनी कुंकळळी पोलिस स्थानकात झालेल्या प्रकाराची माहिती दिली असून या प्रकारामुळे धार्मिक भावना दुखावतील. त्यामुळे सदर शाळेस अशा गोष्टी करू नये अशा सूचना पोलिसांनी द्याव्यात अशी मागणी त्यांनी केली आहे.