रत्नागिरीत एसटी कर्मचाऱ्यांमध्ये संताप
रत्नागिरी :
एसटी महामंडळाकडून कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचे केवळ 56 टक्के इतकेच वेतन देण्यात आले आह़े यामुळे रत्नागिरीतील कर्मचाऱ्यांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आह़े कर्जाचे हफ्ते, घर खर्च त्यातच लगीन सराईचे दिवस आदींचा मेळ कसा साधावा, असा प्रश्न कर्मचाऱ्यांना पडला आह़े याबाबत मंगळवारपर्यंत संपूर्ण पगार मिळाला नाही तर आंदोलन करण्याचा इशारा कर्मचारी संघटनांकडून देण्यात आला आह़े
रत्नागिरी विभागात चालक, वाहक, यांत्रिकी तसेच कार्यालयीन कर्मचारी आदी मिळून 3 हजार 400 कर्मचारी आहेत़ कर्मचाऱ्यांच्या खात्यात केवळ 56 टक्के पगार झाल्यानंतर त्यांना धक्का बसल़ा एवढा कमी पगार नेमका कशामुळे झाला, याबाबत कर्मचाऱ्यांमध्ये चलबिचल झाल़ी एकमेकांना फोन करून कर्मचारी विचारणा करत होत़े अखेर एसटी महामंडळाकडून याबाबत खुलासा करण्यात आल़ा शासनाकडून येणारा निधी कमी आल्याने केवळ 56 टक्के पगार करण्यात आल्याचे सांगण्यात आल़े
- मंगळवारपर्यंत पूर्ण पगार होण्याची वाट पाहणार
एसटी कर्मचारी संघटनांकडून वेतनाबाबत चर्चा सुरू आह़े मंगळवारपर्यंत पूर्ण पगार होईल, असे सांगण्यात आले. मंगळवारी पूर्ण पगार न झाल्यास पुढील निर्णय घेण्यात येईल, असे एसटीचे कर्मचारी विजय गोर यांनी सांगितल़े
- ..अन्यथा धरणे आंदोलन करणार
तुटपुंज्या वेतनामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये कमालीची नाराजी आह़े शासनाकडून मंगळवारपर्यंत वेतन होईल, असे सांगण्यात आले. त्यामुळे एसटी कामगार संघटनेकडून वाट पाहण्याचा निर्णय घेण्यात आला आह़े 15 एप्रिलपर्यंत कर्मचाऱ्यांचे उर्वरित पगार न झाल्यास धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा एसटी कामगार संघटनेचे पदाधिकारी अमित लांजेकर यांनी दिला आह़े