अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी सेवाभावीपणे कार्य करावे
मंत्री सतीश जारकीहोळी : 11 जणांना नेमणूक आदेशपत्रांचे वितरण
त. भा.वार्ताहर/ गोकाक
ग्रामीण भागात मुलांचा सर्वांगीण विकास, पौष्टीक आहार व महिलांच्या कल्याणासाठी अंगणवाडी केंद्रे मुख्य भूमिका बजावतात. सरकारच्या योजना पात्र व्यक्तीपर्यंत पोहोचविण्यात अंगणवाडी कर्मचाऱ्यांची जबाबदारी महत्त्वपूर्ण ठरते. अंगणवाडीवर नेमणूक झालेल्या कर्मचाऱ्यांनी निष्ठा, प्रामाणिकपणा व सेवाभावीपणे कार्य करावे, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम तथा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी केले.
येथील हील गार्डनमधील कार्यालयात महिला-बालकल्याण खाते बेळगाव व हुक्केरी शिशुकल्याण योजनेंतर्गत यमकनमर्डी विधानसभा मतदारसंघातील अंगणवाड्यांसाठी निवड करण्यात आलेल्या शिक्षिका व साहाय्यिकांना नेमणूक आदेशपत्रांचे वितरण मंत्री जारकीहोळी यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.
मुलांच्या सर्वांगीण विकासात अंगणवाड्यांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. मुलांना सुरुवातीपासूनच पौष्टीक आहार, आरोग्याबाबत जाण करून देणे, पूर्वप्राथमिक शिक्षण हे त्यांच्या भवितव्याला पूरक ठरते. त्या अनुषंगाने अंगणवाडी पेंद्रे ग्रामीण भागातील मुलांना मूलभूत सेवा उपलब्ध करून देत असतात. गर्भवती, बाळंतिणी व बालकांना सरकारच्या विविध कल्याण योजनांचा लाभ मिळवून देण्यात अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भूमिका निर्णायक ठरते. त्यामुळे अंगणवाडीवर निवड झालेल्या कर्मचाऱ्यांनी मुलांचे आरोग्य, पौष्टीक आहार, स्वच्छता व शिक्षण यावर भर द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी 3 अंगणवाडी शिक्षिका व 8 साहाय्यिका अशा एकूण 11 जणांना मंत्री जारकीहोळी यांच्या हस्ते नेमणूक आदेशपत्रांचे वितरण झाले. महिला-बालकल्याण खात्याचे अधिकारी के. व्ही. राममूर्ती यांच्यासह अन्य मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.
