भरपावसात अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे जेलभरो आंदोलन ! जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या
अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जेलभरो आंदोलन केले.
अंगणवाडी सेविका मदतनीसांच्या प्रलंबित मागण्यासाठी 15 जुलै पासून राज्यव्यापी आंदोलन सुरु आहे.त्याचाच एक भाग म्हणून गुरुवारी कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने जेलभरो आंदोलन करण्यात आले.आप्पा पाटील आणि जयश्री पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
5 डिसेंबर व 25 जानेवारी रोजी झालेल्या बैठकीमध्ये महिला बालविकास मंत्री व प्रधान सचिव, महिला व बालविकास यांनी ‘अशांचे मानधन वाढल्यास अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन वाढवण्यात येईल.‘ या दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करून भरीव मानधन वाढीचा निर्णय करा व ताबडतोब त्याचा शासकीय आदेश काढा. सर्वोच्च न्यायालयाने ग्रॅच्युईटीबाबत दिलेल्या निकालाच्या अंमलबजावणीबाबत शासकीय आदेश काढावा,कमीत कमी योगदान आधारित मासिक पेन्शन योजना लागू करण्याच्या निर्णयाचा शासकीय आदेश ताबडतोब काढून त्याची अंमलबजावणी करावी, मदतनीसांच्या सेविकापदी व सेवकांची मुख्य सेविका पदी नियुक्ती ताबडतोब सुरु करावी अशा मागण्यासाठी 4 डिसेंबर पासून राज्यभरातील सुमारे दोन लाख अंगणवाडी सेविका बेमुदत संपावर गेलेल्या होत्या. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातीलही सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस बेमुदत संपावर गेलेल्या होत्या.मात्र शासनाकडून कोणतीही मागणी मान्य झालेली नाही. अंगणवाडी सेविका मदतनीसांच्या प्रलंबित मागण्यांसाठी 15 जुलै पासून पुन्हा राज्यव्यापी आंदोलन सुरु केलेले आहे.
त्याचाच एक भाग म्हणून गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जेलभरो आंदोलन करण्यात आले.त्यापूर्वी सेविकांनी असेंब्ली रोडवरुन जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर आल्यावर अंगणवाडी सेविकांनी रस्त्यावरच ठिय्या मारत जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळित झाली. यावेळी पोलीसांनी बळाचा वापर करत आंदोलनकर्त्या महिलांना धरुन पोलीस व्हॅनमध्ये बसवले. यामुळे आंदोलकांनी पुन्हा घोषणाबाजी केली. या आंदोलनात शोभा भंडारे, अर्चना पाटील,सरीता कंदले, मंगल गायकवाड, सुनंदा कुऱ्हाडे, दिलशाद नदाफ, सुरेखा कांबळे, विद्या कांबळे, सुरेखा कोरे यांच्यासह महिला मोठया संख्येने सहभागी झाल्या होत्या.