अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरुच राहणार
अंगणवाडी कृती समितीचे कॉम्रेड आप्पा पाटील यांची माहिती
कोल्हापूर प्रतिनिधी
अंगणवाडी सेविकांना 26 हजार व मदतनीसांना 20 हजार रुपये किमान वेतन मिळावे या मागणीसाठी 4 डिसेंबर पासून राज्यातील सुमारे दोन लाख अंगणवाडी सेविका व मदतनीस बेमुदत संपावर आहेत. यापूर्वी अनेक आंदोलने केल्यानंतर15 डिसेंबर रोजी नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू असल्याने याठिकाणी महामोर्चा काढण्यात आला. यावेळी संपूर्ण राज्यातून हजारो कर्मचारी सहभागी झाले होते. यादरम्यान अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्यावतीने महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना शिष्टमंडळाने भेट घेऊन निवेदन दिले. मात्र यावेळी त्यांनी हा मुद्दा मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करून निर्णय घेऊ असे सांगितले होते. पण त्याबाबत अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संप सुरुच राहणार असल्याची माहिती संघटनेचे पदाधिकारी कॉम्रेड आप्पा पाटील यांनी पत्रकाद्वारे दिली.
अंगणवाडी कर्मचारे कृती समितीच्या वतीने हा संप सुरूच ठेवला जाणार आहे. यावेळी मंत्री तटकरे यांना भेटलेल्या शिष्टमंडळात कॉम्रेड शुभा शमीम, आप्पा पाटील, भगवानराव देशमुख, नीलेश दातखीळ, दिलीप उटणे, निशा शिवरकर, सुवर्णा तळेकर यांचा समावेश होता. मोर्चात कोल्हापूर जिह्यातून सुमारे 500 सेविका व मदतनीस सहभागी झाल्या होत्या.