अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन करणार पडताळणी
घरात ती दिसली तर थेट लाभ रद्द
लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी
पुणे
लाडक्या बहिणींच्या घरी चारचाकी असेल तर आता लाडकी बहीण योजनेचा लाभ थेट रद्द होणार आहे. राज्यातील लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिला सुमारे अडीच कोटींपर्यंत पोहोचल्या आहे. त्यामध्ये निकषांची पूर्तता न करणाऱ्या महिलांची संख्या अधिक असल्याची शक्यता वर्तविला जाते आहे. त्यामुळे महिला व बालकल्याण विभागातर्फे निकषात न बसणाऱ्या महिलांचा लाभ बंद करण्यासाठी काही उपाययोजना सुरु करण्यात आल्या आहेत. असे केल्याने योजनेतील जे योग्य लाभार्थी आहेत त्यांनाच लाभ मिळेल. सरकार तर्फे जे २१०० रुपयांचे आश्वासन देण्यात आले आहे, त्याची अंमल बजावणी करताना सरकारी तिजोरीवर कोणताही बोजा पडणार नाही, यासाठी ही खबरदारी घेतली जात आहे.
राज्यातील अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन लाभार्थी महिलांच्या विषयी पडताळणी करणार आहेत. यापैकी ज्या लाडक्या बहिणींच्या घरी चारचाकी असेल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभा थेट रद्द केला जाणार आहे. आजपासून (मंगळवार दि. ४) राज्यात पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका जाऊन पडताळणी करणार आहे. महिला व बालकल्याण विभागाचे सचिव डॉ. अनुप कुमार यादव यांनी काल (दि.३) रोजी ऑनलाईन बैठक घेत राज्यातील सर्व अधिकाऱ्यांना लाभार्थी महिलांच्या घरोघरी जाऊन चारचाकी आहे किंवा नाही याची पडताळणी करण्याचे आदेश दिले आहे. तसेच परिवहन विभागाकडून वाहनधारकांची यादी घेऊन ती प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आली आहे.