अंगणवाडी-मध्यान्ह आहार कर्मचाऱ्यांचे 1 रोजी हुबळी येथे आंदोलन
प्रतिनिधी/ बेळगाव
सीटू संघटनेच्यावतीने सोमवार दि. 1 डिसेंबर रोजी केंद्र सरकारच्या विविध धोरणांच्या विरोधात आंदोलन छेडण्यात येणार आहे. हुबळी येथे होणाऱ्या या आंदोलनाला बेळगाव तालुक्यातील सर्व अंगणवाडी कर्मचारी, तसेच शाळांमध्ये स्वयंपाक करणाऱ्या सर्व महिलांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन तालुका अध्यक्ष मंदा नेवगी यांनी केले आहे.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी अंगणवाड्या बंद करून तर शाळांमध्ये स्वयंपाक करणाऱ्या महिलांनी मध्यान्ह आहार बंद ठेऊन मोर्चामध्ये सहभागी व्हायचे आहे. हुबळी येथील संसद कचेरी, चिटगुप्पी हॉस्पिटलच्या आवारात आंदोलन केले जाणार आहे. याची माहिती बेळगावच्या महिला व बालकल्याण खात्याच्या अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे देण्यात आली आहे. अधिकाधिक महिलांनी आंदोलनामध्ये सहभागी होण्याचे आवाहन अनिता पाटील, सुनीता बळग, सुनीता टोपोजी, रत्ना पायेकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.