For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अंगणवाडीतील बालविकास समित्या निष्क्रिय

10:00 AM Nov 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
अंगणवाडीतील बालविकास समित्या निष्क्रिय
Advertisement

काही ठिकाणी समित्याच नसल्याने गैरकारभारात वाढ : कारभाराच्या पारदर्शकतेबाबत प्रश्न

Advertisement

बेळगाव : अंगणवाडीचा कारभार पारदर्शकपणे चालावा यासाठी 2020 मध्ये शासनाने बालविकास समिती स्थापन करण्याचा आदेश जारी केला होता. मात्र सदस्यांच्या दुर्लक्षपणामुळे ही समिती निष्क्रिय ठरली आहे. त्यामुळे अंगणवाडीतील कारभाराबाबत चिंता व्यक्त होऊ लागली आहे. बेळगाव जिल्ह्यात 5656 अंगणवाडी केंद्रे आहेत. त्यामध्ये लहान मोठ्या अंगणवाडी केंद्राचा समावेश आहे. या अंगणवाडी केंद्रामधून विविध शासकीय योजना आणि सुविधा पुरविल्या जातात. या सुविधा पुरविताना पारदर्शकता रहावी, यासाठी बालविकास समितीची स्थापना करण्यात आली आहे. मात्र समितीतील सदस्य म्हणावे तसे सक्रिय नसल्याने अंगणवाड्याच्या कारभारावर देखरेख कोण करणार, असा प्रश्नही उपस्थित होऊ लागला आहे.

अंगणवाडीचा कारभार विस्कळीत

Advertisement

बालविकास समितीमध्ये प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक, पाल्यांचे आई-वडील, आजी-आजोबा, स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी, स्त्राrशक्ती गटातील एखादा प्रतिनिधी आदींचा समावेश असतो. शिवाय अंगणवाडी सेविका सचिव म्हणून कार्यरत असतात. समितीचे अध्यक्ष, सदस्य आणि सचिवांच्या नावाने संयुक्त खातेही उघडले जाते. दर महिन्याला बैठक घेऊन प्रगतीचा आढावा घेण्याची तरतूद आहे. मात्र अद्यापी बऱ्याच अंगणवाडी केंद्रामध्ये बालविकास समित्या स्थापन झाल्या नाहीत. तर काही ठिकाणी त्या सक्रिय नाहीत. त्यामुळे अंगणवाडीचा कारभार विस्कळीत होऊ लागला आहे.

बालविकास समितीच सक्रिय नसल्यामुळे कामांना खीळ

अंगणवाडी बाबतच्या तक्रारी नेंदविण्यासाठी प्रत्येक अंगणवाडी केंद्रात तक्रार पेटी ठेवणे बंधनकारक आहे. दरम्यान प्राप्त झालेल्या तक्रारींचा मासिक बैठकीत आढावा घेऊन चर्चा करणे आवश्यक आहे. अंगणवाडी सेविका आणि साहाय्यिकांच्या गैरवर्तन आणि इतर तक्रारी बालविकास अधिकाऱ्याकडे पाठविण्याचे अधिकारी समितीला देण्यात आले आहे. मात्र बालविकास समितीच सक्रिय नसल्यामुळे या सर्व कामांना खीळ बसली आहे.

समितींची कामे कोणती?

अंगणवाडीच्या विकासासाठी कृती आराखडा तयार करणे, मुलभूत सविधा पुरविणे, दर महिन्याला बैठक घेणे, अंगणवाडीतील केंद्रातील समस्या दूर करणे, बालकांचे लसीकरण आणि आरोग्याकडे लक्ष देणे, मुलांचा वाढदिवस साजरा करणे, अंगणवाडीमध्ये पर्यवेक्षक म्हणून काम करणे, मात्र अंगणवाड्यामध्ये समित्याच अस्तित्वात नसल्यामुळे अनेक बेकायदेशीर कारभार वाढू लागला आहे. अंगणवाडीतील धान्याची लूट करणे, मुलांना पोषण आहार, अंडी वेळेवर न देणे अशा तक्रार वाढू लागल्या आहेत. याबाबत महिला व बालक कल्याण खाते बालविकास समित्या स्थापन करण्यासाठी कोणती भूमिका घेणार हेच आता पहावे लागणार आहे.

समितीने सक्रिय होण्यासाठी विशेष पाऊले उचलावीत

ज्या अंगणवाडी केंद्रांमध्ये बालविकास समित्या स्थापन केल्या नाहीत. याबाबतची माहिती मिळाल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. निष्क्रिय झालेल्या समितीने सक्रिय होण्यासाठी विशेष पाऊले उचलावीत, आणि अंगणवाडी केंद्रांना सहकार्य करावे.

-नागराज आर. (महिला व बालकल्याण खात्याचे सहसंचालक)

Advertisement
Tags :

.