विचारांवर चालताहेत यंत्रमानव
यंत्रमानव हे मानवाच्या आज्ञेअनुसार काम करतात, याची आपल्याला माहिती आहे. तथापि, आता चीनने माणसाच्या मेंदूत निर्माण होणाऱ्या विचारांच्या तरंगांवर काम करणारे यंत्रमानव निर्माण केले आहेत. या यंत्रमानवांना प्रत्यक्ष तोंडी किंवा डिजिटल पद्धतीने आज्ञा द्याव्या लागत नाहीत. तर त्यांना चालविणाऱ्या माणसाच्या मनात जे विचार असतील, त्यांचा धागा पकडून हे यंत्रमानव काम करतात. कोणालाही आचंबित करणारे हे तंत्रज्ञान चीनच्या संशोधकांनी शोधून काढले आहे.
या यंत्रमानवांना सक्रीय करण्यासाठी आपल्याला हाताने खाणाखुणा कराव्या लागत नाहीत, किंवा तोंडातून शब्द काढावे लागत नाहीत. आपल्या मनात जो विचार प्रकर्षाने येईल, त्या विचारलहरी समजून घेऊन हे यंत्रमानव काम करतात. अशा यंत्रमानवांनी विशिष्ट काम करावे, असा विचार आपल्या मनात निर्माण झाला, तर त्यानुसार या यंत्रमानवांच्या हालचालींना प्रारंभ होतो. या यंत्रमानवांचे प्रदर्शन चीनकडून ‘यंत्रमानव परिषद-2026’ या परिषदेत करण्यात आले आहे. उपयोगकर्त्याला व्हिल चेअर चालवायची असेल, तरी हातांचा उपयोग करण्याची आवश्यकता नाही. केवळ मेंदूतील विचारतरंगांना जाणून व्हिलचेअर हालचाल करु लागते. तसेच विचारांच्या आधारावरच ती विशिष्ट दिशेला जाऊ लागते. त्यामुळे आपले हात किंवा इतर अवयव यंत्रमानव चालविण्याच्या कामात गुंतून पडत नाहीत, असे या यंत्रमानवांच्या निर्मात्यांचे म्हणणे आहे. यांत्रिक हातही अशा प्रकारे चालू शकतात आणि आपल्याला हव्या असलेल्या वस्तू उचलून आपल्याजवळ किंवा समोर ठेवू शकतात. दिव्यांग असलेल्या किंवा वयपरत्वे हालचाल मंदावलेल्या व्यक्तींसाठी हे विचारतरंगांच्या आधारावर चालणारे यंत्र मानव किंवा यंत्र अवयव अत्यंत लाभदायक ठरु शकतील, असे संशोधकांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे, हा यंत्रमानव विचारतरंगांच्या आधारावर पेंटिंगही निर्माण करु शकतो, असे दिसून येते.