अंधारी खून : दोन दिवसात उलगडणार ?
सातारा :
अंधारी (कास, ता. जावली) येथे संजय गणपत शेलार याचा मृतदेह झाडीत आढळून आला होता. या घटनेला दोन आठवडे उलटून गेले तरी अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नाही. त्यामुळे खुनाचे गूढ वाढत आहे. या प्रकरणात बड्या धेंड्यांची नावे घेतली जात आहेत. तसेच या प्रकरणी मोठा दबाव असल्याचेही स्पष्ट होत असतानाच पोलिसांचे हात संशयित आरोपीच्या गळ्यापर्यंत पोहोचले असून दोन दिवसांतच याचा छडा लागण्याचे संकेत पोलिसांकडून मिळत आहेत.
अंधारी येथील रहिवासी आणि कुटुंबासह वाईत नोकरीला असलेल्या संजय शेलारचा मृतदेह 2 जानेवारीला कास परिसरात सापडला होता. वाईतून गावाकडे येताना त्याच्यासोबत रिक्षात अन्य कोणी असल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले असले तरी ‘तो कोण’ असा प्रश्न निर्माण झाला आहे. कास, जावली, वाई परिसरात ‘तो’ स्वत:च आका आहे की आकाचा कोणी आका आहे, अशा चर्चा सुऊ आहेत. याप्रकरणात तपासाला बंधन येण्याचे कारण काय, गेल्या 14 दिवसात कोणालाच ताब्यात घेतले नाही, याबाबतही चर्चा आहेत. खुनासंदर्भात अनेकांची चौकशी झाली असली तरी कोणाला अटक न झाल्याने पोलीस तपासावर दबाव असल्याचे स्पष्ट होत आहे.
‘तऊण भारत’ने याबाबत सखोल माहिती घेतली असता, मेढा पोलिसांचा तपास अंतिम टप्प्यात आला असल्याचे स्पष्ट होत असून, पोलिसांचे हात आरोपीच्या गळ्यापर्यंत पोहोचले आहेत. येत्या 48 तासांत या खुनाचा उलघडा होण्याची शक्यता आहे.
- खुनाचे कारण आर्थिक की अन्य कारणातून...
खुनाचे गूढ कायम असून आर्थिक संबंधातून खून झाल्याची शक्यता लोकांकडून बोलल्या जात आहेत. संजय शेलार कन्स्ट्रक्शनमध्ये कामाला होता. तसेच रिक्षाही चालवत होता. आर्थिक देवाणघेवाणीतून खून झाल्याचा कयास काढत तपास करण्यात आला. झालेल्या तपासात त्याचे कोणतेच मोठे व्यवहार आढळून आलेले नाहीत. त्यामुळे पोलिसांनी तपासाची दिशा बदलत त्याला गती देण्याची गरज आहे.
- अचानक आंदोलन स्थगित झाले...
संजय शेलार खूनप्रकरणी तपास पुढे जात नव्हता. संशयितांना अटक होत नव्हती. त्यामुळे अंधारी परिसरात 20 गावच्या ग्रामस्थांनी तसेच साताऱ्यातील रिपाईचे नेते दादा ओव्हाळ यांनी मंगळवारी आंदोलनाचा इशारा दिला होता. ग्रामस्थांचे आंदोलन अचानक रद्द झाले तर दादा ओव्हाळ यांचे आंदोलन निवेदनापुरते शिल्लक राहिले. खुनाचे गूढ कायम असताना स्थगित झालेल्या आंदोलनाचे गूढ नव्याने वाढले आहे.