....आणि दिव्याने घर उजळले
तरुण भारत इम्पॅक्ट : ठक्याच्या धनगरवाड्यात सौर उजैचा दिवा
कोल्हापूर प्रतिनिधी
दाजीपूर अभयारण्यलगतच्या ठक्याच्या धनगर वाड्यातील कोकरे परिवाराचे घर रविवारी सायंकाळी सौर ऊर्जेच्या दिव्यांनी उजळले. या धनगर वाड्यात लक्ष्मीबाई सोनाबाई या दोन वृद्ध महिला त्यांच्या मुलासोबत राहतात . हा धनगरवाडा पिढ्या-पिढ्याचा आहे . कोकरे परिवाराचे एकच घर आहे .तिन्ही बाजूला या दाट जंगल आहे . या परिस्थितीत गेली कित्येक वर्ष शासकीय सौर ऊर्जेचा दिवाही बंद पडला होता . अशा जगण्याच्या लढाईचे वृत्त तरुण भारत संवाद मध्ये प्रसिद्ध झाले होते. त्याची दखल घेत समाजातून मदतीचा एकेक हात पुढे येऊ लागला व रविवारी चक्क सौर ऊर्जेचा खांब अंगणात उभारून या परिवाराला सौर ऊर्जेचा प्रकाश मिळवून दिला गेला.
महावितरणचे कार्यकारी अभियंता दत्तात्रय भणगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वखर्चाने सौर ऊर्जेचा खांब तयार करून घेतला . रेन ड्रोन पॉवरचे विलास पिरळकर विलास डवर विलास भुईगडे यांनी त्यांना साथ दिली. हे सर्व साहित्य घेऊन ते दाजीपूर ठक्याच्या धनगर वाड्यात गेले .तेथे महेश लाड हर्षल सुर्वे आनंदराव पाटील जय अकोळकर अमन सय्यद प्रथमेश जाधव यांनीही उभारणीसाठी सहकार्य केले व सायंकाळपर्यंत अंगणात सोलर पॅनल व इतर यंत्रणा उभी केली. दिवस मावळल्या नंतर सोनाबाई या ८० वर्षाच्या माऊलीने सोलर वीज प्रवाह सुरू केला व घरात प्रकाश खेळू लागला .या परिसरात दाट जंगल व सरपटणाऱ्या प्राण्यांचा वावर असल्याने रात्री प्रकाशाची नितांत गरज होती.
याच प्रकारे महाराष्ट्र हायस्कूलच्या 1989 -90 च्या दहावीच्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी दाजीपूर येथे जाऊन कोकरे कुटुंबाला जीवनावश्यक वस्तूंची मदत केली. यात मनोज चौगुले, दीपक घाडगे , साळुंखे ,अंकुश पाटील ,अरविंद गंगाधर , पवार, विजय पाटील, जीवन माने, सुरज शिंदे , सुरेश साळुंखे , दिवटे, अमोल अहिरे , संदीप पाटील सहभागी झाले.