For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

...आणि कानडी कलाकार गहिवरले

11:29 AM Jun 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
   आणि कानडी कलाकार गहिवरले
Advertisement

लोकमान्य रंगमंदिरातील शेवटचा प्रयोग : प्रत्येक कलाकाराकडून भरभरून प्रशंसा

Advertisement

बेळगाव : पूर्वी ‘रिझ’ टॉकीज म्हणून प्रसिद्ध असलेल्या आणि आज लोकमान्य रंगमंदिर म्हणून नावारुपास आलेल्या रंगमंदिराचे काम 1 जूनपासून स्थगित करण्यात आले आहे. तरुण भारतमध्ये याबाबत 1 जूनच्या अंकामध्ये ‘निरोप घेतो आपुला, आज्ञा असावी’ हा वृत्तांत प्रसिद्ध झाला आणि अनेकांनी फोन करून रंगमंदिराबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त करून आठवणींना उजाळा दिला. रंगसंपदा या संस्थेचे पदाधिकारी आणि एक नाट्याकलाकार अरविंद कुलकर्णी यांनी तरुण भारतकडे आपल्या भावना आवर्जुन पोहोचवल्या. ते म्हणतात, गेल्या 47 वर्षांत कर्नाटक आणि महाराष्ट्र येथे आपण अनेक नाट्याप्रयोग केले. बेळगावला 1991 पासून स्कूल ऑफ कल्चर, त्यानंतर चिंदोडी लिला रंगमंदिर व नंतर कलामंदिर येथे प्रयोग केले. मध्यंतरीच्या काळात संस्था सक्रिय राहिली नाही. मात्र 2016 मध्ये डॉ. अरविंद कुलकर्णी यांनी रंगसंपदा या संस्थेचे अध्यक्षपद स्वीकारले आणि बेंगळूरच्या समुदया या संस्थेच्या पहिल्या कानडी नाटकाचा प्रयोग लोकमान्य रंगमंदिर येथे पार पडला.

दहा वर्षांत 146 नाट्याप्रयोग

Advertisement

तेव्हापासून गेल्या 10 वर्षांत कोविडचे एक वर्ष वगळता दरवर्षी 13 ते 15 नाट्याप्रयोग असे एकूण 146 नाट्याप्रयोग लोकमान्य रंगमंदिरमध्ये झाले. बेंगळूरच्याच रंगशंकरा या संस्थेने दरवर्षी पाच प्रयोग या मंदिरात केले. तसेच रंगायन या संस्थेने दरदिवशी तीन या प्रमाणे डायनासोर्सची नाटके करून बालचमूला आनंद दिला. रंगसंपदाचे पहिले नाटक ‘गती’ 2017 मध्ये लोकमान्य रंगमंदिर येथे पार पडले. तत्कालीन जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. रविकांतेगौडा यांनी प्रयोगाचे उद्घाटन करताना प्रथमच इतकी प्रचंड गर्दी आपण पाहत असल्याचे सांगितले. राघवेंद्र स्वामींवरील ‘परिमळ दवरू’ हा नाट्याप्रयोग साडेसहाशे रसिकांनी पाहिला. तसेच ‘फुकटे सलाहे’ हे कॉमेडी नाटकसुद्धा रसिकांना हसवून गेले.

रसिकांना अश्रू अनावर

या दहा वर्षांत प्रत्येक कलाकाराने लोकमान्य रंगमंदिराची प्रशंसा केली. येथील ध्वनी आणि प्रकाश योजना याबद्दल गुरुदत्त पेडणेकर व राजा पवार यांच्या परिश्रमाला धन्यवाद दिले. दि. 31 मे रोजी डॉ. हेलेन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘अमीरबाई कर्नाटकी’ हा नाट्याप्रयोग सादर केला आणि ज्या क्षणी हा रंगमंदिरातील शेवटचा प्रयोग असे त्यांना समजले तेव्हा केवळ कलाकारच नव्हे तर उपस्थित 300 हून अधिक रसिकांचे डोळे पाणावले. गहिवर आवरणे त्यांना अशक्य झाले. डॉ. बसवराज जगजंपी, एल. एस. शास्त्री व मला अश्रू आवरणे खरोखरच कठीण झाले, असे अरविंद कुलकर्णी यांनी नमूद केले.

गेल्या दहा वर्षांपासून आम्ही केलेल्या अनेक नाट्याप्रयोगांच्या स्मृति आमच्या मनाच्या पटलासमोरून तरळून गेल्या. अनेक कलाकारांना या रंगमंदिराने पुढे आणले. त्यांच्या कलेला येथे धुमारे फुटले. कोणताही भेद न आणता रंगमंदिराचे संचालक डॉ. किरण ठाकुर यांनी सर्वांसाठीच हे रंगमंदिर नेहमीच आपुलकीने उपलब्ध करून दिले. त्यांच्याप्रती आम्ही कृतज्ञ आहोत. मात्र आता दुसरे रंगमंदिर तेच उभे करू शकतात, अशा भावना अरविंद कुलकर्णी यांनी व्यक्त केल्या.

रंगमंदिराशी ऋणानुबंध

रंगमंदिर सुरू झाल्यापासून पंधरा वर्षांहून अधिक काळ गुरु व राजा रंगमंदिरशी जोडले गेले. ध्वनी संयोजन, प्रकाश योजना यासाठी त्यांची धडपड बेळगावच्या आणि बाहेरच्या रसिकांनीही पाहिली आहे. गाण्यांची मैफल, नाट्याप्रयोग, एकांकिका, शारदोत्सवाचे कार्यक्रम इतकेच नव्हे तर महिलांचे तीळगूळ समारंभ, शाळांची स्नेहसंमेलने असे एक ना अनेक कार्यक्रम येथे झाले.प्रत्येक संस्थेची मागणी वेगळी होती. कलाकारांच्या अपेक्षा वेगळ्या असतात. पाही जणांचे रुसवेफुगवेसुद्धा. परंतु या दोघांनी चेहऱ्यावर कधीही त्रासिक भाव दाखवले नाहीत, ना कुणावर आवाज चढवला. त्यामुळे गुरु आणि राजा हे रंगमंदिराचे हुकमी एक्के होते. त्यांना अंकुशची तितकीच साथ लाभली. आपल्या सर्वांपेक्षा यांना रंगमंदिराचा सहवास अधिक लाभला. त्यामुळे त्यांची वियोगाची वेदना अधिक तीव्र आहे.

Advertisement
Tags :

.