आणि पांडु तात्या घरात परत आले..
कोल्हापूरः सुधाकर काशीद
पांडू तात्या गेले.. गेले... म्हणून कालवा सुरू झाला. घरातल्या बायकांचा आक्रोश गल्लीभर पसरला. पै पाहुण्यांना निरोप पोहोचवले. आता आता पांडू तात्या गेले ,म्हणजे फक्त बॉडी रुपात राहिले. त्यामुळे थोड्याच वेळात " बॉडी " घराकडे आणणार असे नातेवाईकांना कळवले गेले. अंत्यविधीचे साहित्य आणण्याची तयारी सुरू झाली. पांडू तात्या वारकरी . त्यामुळे टाळ मृदंगाच्या गजरात त्यांना अखेरचा निरोप द्यायची त्यांच्या वारकरी सहकाऱ्यांनी जुळणी केली .
पांडू तात्यांची बॉडी घराकडे ॲम्बुलन्स मधुन आणली जाऊ लागली . रस्त्यात असंख्य खाच खळगे. त्यातून वाट काढत येता येता एका वळणावर ॲम्बुलन्स मध्ये बसलेल्या त्यांच्या एका नातेवाईकाला तात्याच्या उजव्या हाताची थोडी हालचाल होत असल्याची जाणीव झाली. त्यांनी हाताकडे एक टक बघत चार-पाच वेळा खात्री करून घेतली. आणि त्यांनी दुसऱ्या नातेवाईकाला, ॲम्बुलन्सच्या ड्रायव्हरला पांडू तात्याचा हात हालायला लागलाय असे सांगितले. ते ऐकून ॲम्बुलन्स ड्रायव्हरने काचकन ब्रेकच लावला. त्यानेही पाहिले . तात्यांचा हात हालत होता . बोट वळत होती. मग त्या सर्वांनी मिळून तात्यांना त्याच अवस्थेत डी वाय पाटील हॉस्पिटलला नेले तेथे तातडीने पुढचे उपचार सुरू झाले . आणि आश्चर्य काय?तात्यांचे शरीर थोड्या वेळात पूर्वपदावर येऊ लागले .तात्या गेले . तात्या गेले . असा निरोप देणारे ,तात्या जिवंत झाले ....तात्या जिवंत झाले असा परत निरोप देऊ लागले.
तात्यांच्यावर गेले दहा ते बारा दिवस हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते .काल त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आणि ज्या पांडू तात्यांची त्यांच्या घराच्या दारातून अंत्ययात्रा निघणार होती तेथेच पांडू तात्यांच्या स्वागतासाठी नातेवाईकांची गर्दी जमली .तात्यांची सर्वांनी ओवाळणी केली . चादरीत गुंडाळून दवाखान्यात नेलेल्या तात्यांनी आता पांढराखडं शर्ट, विजार ,गांधी टोपी आणि कपाळावर बुक्का अशा त्यांच्या मूळ पेहरावात पुन्हा घरात पाऊल टाकले . घरातल्या सर्वांचे डोळे तात्यांना पाहून अश्रूने डबडबले . अर्थात काही क्षण मृत्यू अनुभवुन पुन्हा नव्याने परत आलेल्या तात्यांच्या आगमनाचे ते आनंदाश्रू प्रत्येकाच्या डोळ्यातून टपकत राहिले. भारावलेले पांडू तात्या हे सारे पाहून फक्त विठ्ठल ...विठ्ठल ... असे पुटपुटत होते.उपचार करणाऱ्या डॉक्टरांची त्यांना नावे माहीत नव्हती. पण त्या डॉक्टरांच्या बद्दल आकाशाकडे हात करून ते कृतज्ञता व्यक्त करत होते. पांडू तात्या कसबा बावड्यात उलपे मळ्यात राहतात . पांडू तात्या आजारी असताना त्यांना बघायला जेवढी रिघ नव्हती तेवढी रिघ आता मृत्युच्या फज्जाला पाय लावून परत आलेल्या पांडू तात्यांना पाहण्यासाठी होत आहे. नक्कीच नवीन वर्ष आगमनाच्या पूर्वसंध्येला "मेलेला माणूस जिवंत झाला " असली अजिबात सनसनाटी ही बातमी नाही. पण कोल्हापुरात कसबा बावड्यात घडलेली एक सुखद अशी सत्यकथा आहे