For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आणि.... देव पावला!

07:35 AM Jun 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
आणि     देव पावला
Advertisement

भारत-पाकिस्तान हा सामना सुरू होण्याअगोदर भारतात विविध ठिकाणी होम हवन, पूजाअर्चा केल्या होत्या. काही जणांनी तर देव अक्षरश: पाण्यात ठेवले होते. देव पाण्यात ठेवणाऱ्यांपैकी मीही एक होतो. बघता बघता ईश्वराने ‘विजयी भव’ म्हटलं. आम्ही तुमच्याविऊद्ध बाप का आहोत हे भारताने पुन्हा एकदा सिद्ध केलं. कालच्या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा फार महत्त्वपूर्ण होता. नाणेफेक  भारताच्या विऊद्ध गेल्यानंतर शंकेची पाल मनात चुकचुकली. कालच्या लेखात मी म्हटलं होतं की पाकचा वेगवान मारा हा प्रभावी आहे. अर्थात त्याची चुणूक त्यांनी कालच्या सामन्यात दाखवली. सलामीला विराट कोहलीला पाठवण्याचे धाडस पुन्हा एकदा अंगाशी आलं. सामना सुरू होण्याअगोदर सीम गोलंदाजांना जे पोषक वातावरण हवं असतं तसेच वातावरण काल होतं.

Advertisement

कालचा सामना हा थ्रिलर चित्रपट कसा असतो तसा होता. सुऊवातीपासूनच या सामन्यात नेमका हिरो आणि व्हिलन कोण होता हे समजत नव्हतं. आजकाल आपणास 20 षटकात 200, 210 धावा धावफलकावर बघण्याची सवय झाली आहे. परंतु या विश्वचषक स्पर्धेत 140, 150 धावा म्हणजे धावांचा कळसच. त्यातच चेंडू खेळपट्टीवर थांबून येत असल्यामुळे, फलंदाजांचा खऱ्या अर्थाने कस लागत होता. या सर्व फलंदाजांमध्ये ऋषभ पंत पास झाला. पहिल्या सामन्यात  तोच आधारवड होता. कुठल्याही बँकेत कर्ज घेतल्यानंतर जसं जामीनदार महत्त्वाचा असतो, तशाच पद्धतीने गॅरेंटरची भूमिका काल ऋषभ पंतने निभावली. खरं पाहता 120 ही धावसंख्या दुसऱ्या कुठल्या खेळपट्टीवर चिल्लर वाटली असती. परंतु या अमेरिकेच्या खेळपट्टीवर मात्र वटवृक्षासारखी होती. पाकिस्तानविऊद्ध एकदिवशीय सामना असो किंवा टी-20, प्रत्येक चुरशीच्या सामन्यात भारताने बाजी मारली आहे. 2007 चा टी-20 कप आठवा. लीग सामन्यात बॉलआउट केलं. त्यानंतर अंतिम सामन्यात श्रीशांतने घेतलेला तो झेल. 2022 मध्ये विराट कोहलीची ती अविश्वसनीय खेळी. प्रत्येक वेळी नियतीने साथ दिली. काल तर फक्त 119 धावाच फलकावर होत्या. नियोजनपूर्वक जर खेळ केला असता तर हे एक माफक आव्हान होतं. परंतु पुन्हा एकदा बुमराहऊपी देवदूत आपल्यासाठी धावून आला. या बुमराहबद्दल मी उद्याच्या लेखात सविस्तर बोलणारच आहे.

प्रत्येक विद्यार्थ्याला कमीत कमी दहावीच्या परीक्षेतील पहिला पेपर तरी सोपा जावा अशीच अपेक्षा असते. नेमकी तीच गत क्रिकेटमध्ये. बाकी सर्व संघांविऊद्ध पेपर जड गेला तरी चालेल किंबहुना नापास झालो तरी चालेल. परंतु पाकिस्तानविऊद्धचा पेपर फक्त पास होणं हे उद्दिष्ट नसतं तर विशेष प्राविण्य मिळावं ही अपेक्षा असते. नेमकं काल तेच घडलं. टी-20 मध्ये बोलबाला असतो तो फलंदाजांचा. परंतु काल मात्र भारतीय गोलंदाजांनी ज्या पद्धतीने कामगिरी केली त्याचा निश्चितच हेवा वाटतो. भारत-पाकिस्तान सामना म्हटलं की अपेक्षांचं ओझं हे आलंच. त्या अपेक्षांचं ओझं अंगावर घेत भारताने मिळविलेला दिमाखदार विजय हा निश्चितच कौतुकास्पद. क्रिकेटमधील काही सामन्यांच्या विजयाचे मोजमाप नसते. कालचा सामना हा त्यापैकीच एक होता.

Advertisement

चांगल्या सुऊवातीनंतर सुद्धा भारताचा डाव गडगडल्यानंतर बुमराह आणि हार्दिकची गोलंदाजी ही निश्चितच दीर्घकाळ स्मरणात राहणारी. ज्या ज्या वेळी बुमराहच्या हाती चेंडू येतो त्यावेळी तो समोरच्या संघाला भगदाड पाडतो. कालच्या यशात वाटेकरी कोण? हा प्रश्न सर्वानाच पडला असेल. तसा तो मलाही पडलाय. ऋषभच्या 31 चेंडूमधील 42 धावा, की यष्ट्यामागे ऋषभचे ते तीन झेल की हार्दिक पंड्याचे दोन बळी की जसप्रीत बुमराहने ऐन मोक्याच्या क्षणी घेतलेले तीन बळी. यावर कदाचित मतमतांतर असू शकतात. एकंदरीत काय पाकिस्तानच्या पराभवामुळे खऱ्या अर्थाने पाक आता आयसीयूमध्ये गेलाय. त्यांना आता मोठा चमत्कारच या स्पर्धेतून वाचवू शकतो. पुन्हा एकदा देवाचे आणि नियतीचे शतश: आभार.

Advertisement

.