मंदिराच्या उत्खननात सापडला प्राचीन खजिना
इजिप्तमध्ये सापडल्या देवतांच्या मूर्ती
मुस्लीमबहुल इजिप्त हा देश हजारो वर्षे जुन्या प्राचीन वारशांचे केंद्र राहिला आहे. या देशाच्या प्राचीन वारशांनी पूर्ण जगातून पुरातत्व तज्ञ आणि इतिहासप्रेमींना आकर्षित पेले आहे. येथील एका उत्खननात पुरातत्व तज्ञांनी कर्नाक मंदिर परिसरात 2600 वर्षे जुना खजिना शोधला आहे. यात सोन्याच्या दागिन्यांचा एक आकर्षक भांडार आणि देवतांच्या समुहाच्या मूर्ती मिळाल्या आहेत.
हा नवा शोध 26 व्या राजघराण्याच्या कालखंडातील प्राचीन इजिप्तच्या धार्मिक आणि कलात्मक प्रथांविषयी माहिती देणारा आहे. याचबरोबर ख्रिस्तपूर्व 1 हजार साली कर्नाक मंदिर परिसराच्या इतिहास आणि विकासावर नवा प्रकाश टाकणारा हा शोध आहे. येथील कलाकृती लक्सर म्युझियममध्ये मांडण्यात येणार आहेत. यामुळे इजिप्तच्या प्राचीन संस्कृती आणि धार्मिक इतिहासाविषयी अधिक माहिती मिळू शकणार आहे.
प्राचीन इजिप्तचे महत्त्वपूर्ण मंदिर
कर्नाक मंदिराला इजिप्तच्या सर्वात महत्त्वपूर्ण आणि सर्वात दीर्घकाळ अस्तित्वात राहिलेल्या धार्मिक परिसराच्या स्वरुपात ओळखले जाते. लक्सरनजीक असलेल्या या विशाल मंदिर परिसराची निर्मिती सुमारे 4 हजार वर्षांपूर्वी करण्यात आली होती आणि सुमारे एक हजार वर्षापर्यंत याचे सातत्याने नुतनीकरण करण्यात आले होते. हा परिसर शतकांपासून पुरातत्व तपासाचे स्थळ राहिले असून यादरम्यान शेकडो ऐतिहासिक शोध लागले आहेत.
देवतांच्या सोन्याच्या मूर्ती
नव्या शोधात सापडलेल्या सामग्रीत सोन्याचे बीज, ताईत आणि मूर्ती सामील आहेत. यावर जटिल डिझाइन कोरण्यात आले आहे. या सर्व गोष्टी एका तुटलेल्या पात्रात सापडल्या, परंतु संरक्षण विधीमुळे त्यांची स्थिती नेहमीच चांगली राहिली. आढळलेल्या दागिन्यांमध्ये सोने आणि धातूच्या अंगठ्या तसेच तीन देवतांच्या मूर्ती सामील असल्याची माहिती इजिप्तच्या संस्कृती आणि पुरातत अवशेष मंत्रालयाने दिली. उत्खननादरम्यान मिळालेल्या तीन मूर्तींमध्ये प्राचीन इजिप्तच्या तीन प्रमुख देवता सामील आहेत. थेब्सचे शासक देवता अमुन, त्यांची पत्नी आणि मातृदेवता मुट आणि त्यांचे पुत्र खोंसू म्हणजेच चंद्रदेवता यात सामील आहे.