इच्छापूर्ती करणारे पुरातन हनुमान
भारत हा मंदिरांचा देश आहे. आपल्या या देशातील प्रत्येक भागात प्राचीन मंदिरे आढळतात. प्रत्येक मंदिराचा स्वत:चा रोचक इतिहासही असतो. मध्यप्रदेशातील खजुराहो येथे असेच एक अतिप्राचीन मंदीर असून ते भगवान हनुमानांचे आहे. या मंदिरातील हनुमान हे वानररुपातील आहेत. अशी वानररुपातील हनुमानाची मंदिरे कमी आहेत. हे त्यांच्यापैकी सर्वात प्रसिद्ध असणारे एक मंदीर आहे. या मंदिरातील भगवान हनुमानांची मूर्ती 1 सहस्त्र वर्षांहून अधिक काळापूर्वीची असून ती चंदेश राजवंशाने हे मंदीर स्थापन केले आहे.
मंदीर स्थापनेच्यावेळी हा वनमय प्रदेश होता. घनदाट वनात केवळ एक वाट होती. त्या वाटेवरच हे मंदीर स्थापन करण्यात आले. त्यामुळे येथील हनुमानांना ‘गैरगब्बाजी’ असेही संबोधले जाते. आता हे मंदीर पुरातत्व विभागाच्या आधीन करण्यात आले आहे. त्यामुळे याचे सर्व व्यवस्थापन आणि पूजाआर्चा याच विभागाच्या अधिपत्यात होत असते. असे मंदीर दुर्लभ आहे, असे येथील पुरोहितांचे म्हणणे आहे. अशी मूर्ती अत्यंत क्वचित पहावयास मिळते. या मंदिराचे मुख्य वैशिष्ट्या असे म्हटले जाते की, येथील भगवान हनुमान आपल्या भक्तांना स्वत: संदेश पाठवून दर्शन देण्यासाठी बोलावून घेतात. अर्थातच ही केवळ वदंता असल्याचेही काही लोकांचे म्हणणे आहे. तथापि, यावर विश्वास ठेवणाऱ्यांचीही संख्या खूप मोठी आहे. अशा प्रकारे हे भगवान हनुमान ज्यांना बोलावून घेतात, त्यांच्या सर्व मनोकामना येथे पूजाआर्चा केल्यानंतर पूर्ण होतात, अशीही श्रद्धा आहे. अर्थातच, हनुमानांनी संदेश देऊन न बोलाविलेले भक्तही मोठ्या संख्येने येथे येतच असतात. एक जागृत देवस्थान असा या मंदिराचा लौकीक आहे.