अणाव-परबवाडी येथे जिल्ह्यातील पहिल्या वनराई बंधाऱ्याचा शुभारंभ; 15 दिवसांत 10 हजार बंधाऱ्यांचे उद्दिष्ट
सिंधुदुर्ग : अपुऱ्या पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असताना पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा परिषदेने ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ अभियानाला वेग दिला आहे. या अभियानांतर्गत यंदाच्या हंगामातील जिल्ह्यातील पहिला वनराई बंधारा अणाव-परबवाडी येथे उभारण्यात आला.
जिल्हा परिषद, रोटरी क्लब ऑफ कुडाळ, संविता आश्रम पणदूर आणि आकार फाउंडेशन, कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल यांनी येत्या 15 दिवसांत जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये 10 हजारांहून अधिक वनराई व कच्चे बंधारे उभारण्याचा संकल्प व्यक्त केला.
पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे आणि आमदार दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत पाणी संवर्धनाबाबत देण्यात आलेल्या निर्देशांनुसार हा व्यापक उपक्रम हाती घेण्यात आल्याचे साईल यांनी सांगितले. जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या नेतृत्वाखाली अभियान राबविण्यात येत आहे.
या कार्यक्रमाला कुडाळ पंचायत समिती सभापती मिलिंद नाईक, गटविकास अधिकारी प्रवीण हिर्लेकर, अणाव सरपंच लीलाधर अणावकर, रोटरी क्लब ऑफ कुडाळचे अध्यक्ष मकरंद नाईक, संविता आश्रमचे संदीप परब, रोटरी सेक्रेटरी राकेश म्हाडदळकर, कृषी अधिकारी संदेश परब यांच्यासह पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते.