अनन्या पांडेच्या नव्या चित्रपटाची घोषणा
सोशल मीडियावर आधारित कहाणी
स्टुडंट ऑफ द ईयर 2 या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणाऱ्या अनन्या पांडेचे खो गए हम कहां चित्रपटासाठी प्रेक्षकांकडून कौतुक झाले होते. ओटीटीवर प्रदर्शित झालेल्या चित्रपटात अनन्याने सोशल मीडियाच्या सत्याची जाणीव करून देणारा संदेश दिला होता. आता पुन्हा एकदा अनन्या डिजिटल वर्ल्डविषयीची कहाणी घेऊन येत आहे.
अनन्या पांडेच्या नव्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. तिच्या चित्रपटाचे नाव सीटीआरएल आहे. या चित्रपटाची पहिली झलकही निर्मात्यांनी एका व्हिडिओसोबत दाखविली आहे. हा एक थ्रिलर चित्रपट असून तो तंत्रज्ञानावर आधारित असेल. चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
सीटीआरएल चित्रपटात अनन्या ही नेला अवस्थी ही व्यक्तिरेखा साकारत आहे. तर जो मस्कारेन्हास या भूमिकेत विहान समत असेल. दोघेही एक रोमँटिक जोडप्याच्या भूमिकेत असून ते सोशल मीडियावर मिळून कंटेंट तयार करत असल्याचे आणि प्रेक्षक त्यांना पसंत करत असल्याचे दाखविले जाणार आहे. परंतु ब्रेकअपनंतर त्यांचे जीवन बदलून जाते. सोशल मीडियावर अधिक डाटा शेअर केल्यावर लोक कशाप्रकारे स्वत:चे नियंत्रण गमावून बसतात हे चित्रपटात दाखविण्यात येणार आहे.
विक्रमादित्य मोटवानेच्या दिग्दर्शनात तयार होणारा हा चित्रपट नेटफ्लिक्सवर 4 ऑक्टोबर रोजी झळकणार आहे. चित्रपटाची निर्मिती सॅफरन आणि आंदोलन फिल्म्सच्या बॅनर अंतर्गत करण्यात आली आहे. तर अनन्याची पहिली वेबसीरिज कॉल मी बे सप्टेंबर महिन्यात प्रदर्शित होणार आहे.