आनंद, नीना संघांची विजयी सलामी
साईराज चषक क्रिकेट स्पर्धा
बेळगाव : प्रमोद पालेकर क्रिकेट अकादमी आयोजित साईराज चषक 13 वर्षांखालील आंतर क्लब क्रिकेट स्पर्धेत उद्घाटन दिवशी आनंद क्रिकेट अकादमीने एमसीएचा तर नीना संघाने एसकेईचा पराभव करुन विजयी सलामी दिली. सिद्धांत व कृष्णा पाटील यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आले. व्हॅक्सिनडेपो मैदानावर स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पुरस्कर्ते महेश फगरे, रोहीत फगरे, अमर सरदेसाई, तुषार किल्लेदार, संगम पाटील, प्रमोद असलकर, बाळकृष्ण पाटील, विवेक पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते यष्टीचे पूजन करुन सामन्यांना सुरुवात झाली. यावेळी नंदकुमार मलतवाडकर, नागेश सुतार, निखिल वाघवडेकर, आकाश असलकर, प्रवीण कुंदप व प्रभाकर कंग्राळकर आदी उपस्थित होते.
पहिल्या सामन्यात मलतवाड क्रिकेट अकादमी प्रथम फलंदाजी करताना 14.5 षटकात सर्वगडी बाद 49 धावा केल्या. त्यात अथर्व खन्नुकर व श्रवण यांनी प्रत्येकी 10 धावा केल्या. आनंद अकादमीतर्फे अनुराग पाटीलने 4 तर चैतन्यने 3 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना आनंद अकादमीने 8 षटकात बिनबाद 50 धावा करुन सामना 10 धावांनी जिंकला. त्यात अंगद डी.ने 7 चौकारांसह नाबाद 33 तर मोहम्मदने नाबाद 10 धावा केल्या. दुसऱ्या सामन्यात एसकेई संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 8 गडी बाद 81 धावा केल्या. त्यात दक्षने 4 चौकारांसह 22, मिरसाबने 3 चौकारांसह 19 धावा केल्या. नीनातर्फे कृष्णा पाटीलने 11 धावांत 3, श्रेयश पाटीलने 6 धावांत 3 तर झियान व संपत्त यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना नीना संघाने 11.2 षटकात 3 गडी बाद 82 धावा करुन सामना 7 गड्यांनी जिंकला. त्यात अजय लमाणीने 6 चौकारांसह 35, कृष्णा पाटीलने 3 चौकारांसह 19, झियानने 12 धावा केल्या. एसकेईतर्फे अद्वैत भट्टने 2 तर समर्थने 1 गडी बाद केले.