आनंद, हुबळी स्पोर्ट्स विजयी
बेळगाव : केएससीए मान्यता प्राप्त धारवाड विभागीय क्रिकेट संघटना आयोजित केएससीए सेकंड डिव्हीजन क्रिकेट स्पर्धेत आनंद अकादमीने नीना स्पोर्ट्स क्लबचा, हुबळी स्पोर्ट्स क्लब ब ने हुबळी क्रिकेट अकादमीचा पराभव करुन प्रत्येकी 2 गुण मिळविले. युनियन जिमखाना येथे खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात नीना स्पोर्ट्सने प्रथम फलंदाजी करताना 34.5 षटकात सर्वगडी बाद 128 धावा केल्या. त्यात माजिदने 2 षटकार 5 चौकारांसह 51, अर्णवने 3 चौकारांसह 18, समर्थने 3 चौकारांसह 16 धावा केल्या. आनंदतर्फे केतेश कोल्हापुरेने 21 धावांत 4, झिशान सय्यदने 13 धावांत 3, सुधीर गवळीने 17 धावांत 2 तर सुजय पाटीलने 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना आनंद क्रिकेट अकादमीने 20.1 षटकात 1 गडी बाद 127 धावा करुन सामना 9 गड्यांनी जिंकला. त्यात नागेंद्र पाटीलने 1 षटकार 12 चौकारांसह नाबाद 76, लाभ वेर्णेकरने 2 चौकारासह नाबात 29 धावा केल्या. हुबळी येथे खेळविण्यात आलेल्या दुसऱ्या सामन्यात हुबळी स्पोर्ट्स क्लब ब ने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 4 गडी बाद 256 धावा केल्या. नवीन संकपाळने 1 षटकार 13 चौकारांसह नाबाद 102 व सुनील कुमारने 11 चौकारांसह नाबाद 111 धावा करुन दमदार शतके झळकविली. हुबळी अकादमीतर्फे पुनीत दीक्षितने 18 धावांत 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना हुबळी क्रिकेट अकादमीचा डाव 39.2 षटकात सर्वगडी बाद 165 धावांत आटोपला.