आनंद अकादमीकडे केएससीए चषक
बेळगाव : कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना मान्यता प्राप्त धारवाड विभागीय क्रिकेट संघटना आयोजित 14 वर्षांखालील आंतर क्लब क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आनंद क्रिकेट अकादमीने श्री दुर्गा स्पोर्ट्स हुबळी संघाचा 143 धावांनी पराभव करुन विजेतेपद पटकाविले. 95 धावा काढणाऱ्या अंश देसूरकरला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.केएससीए हुबळी मैदानावरती खेळविण्यात आलेल्या अंतिम सामन्यात आनंद क्रिकेट अकादमीने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 5 गडी बाद 227 धावा केल्या. अंश देसूरकरने 9 चौकारांसह नाबाद 95, अथर्व करडीने 5 चौकारांसह 67, ओजस गडकरीने 3 चौकारासह 20 धावा केल्या.
श्री दुर्गा स्पोर्ट्स क्लब हुबळीतर्फे सुप्रित दोड्डगौडर, हर्षित रायबागी व सिद्धार्थ तेरदाळ यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना श्री दुर्गा स्पोर्ट्सचा डाव 30 षटकांत सर्वगडी बाद 84 धावांत आटोपला. दैविक मूगबस्ती 5 चौकारांसह 43, रुपेश सिंग जमादारने 10 धावा केल्या. आनंदतर्फे अथर्व करडीने 15 धावांत 4, अद्वैत चव्हाण व अनुष मालवणकर यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. अथर्व करडीने सलग 4 चेंडूत 4 गडी बाद करत हॅट्ट्रीक नोंदविली. सदर स्पर्धेत 32 संघांनी भाग घेतला होता. या संघाला आनंद करडी यांचे मार्गदर्शन लाभत आहे. मान्यवरांच्या हस्ते चषक देवून त्यांचा सन्मान करण्यात आला.