अनाहत सिंगचे वर्षातील सहावे चॅलेंजर जेतेपद
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
स्क्वॅशमधील सेन्सेशन ठरलेल्या युवा अनाहत सिंगने या वर्षातील सहावे पीएसए चॅलेंजर स्पर्धेचे जेतेपद मिळविताना ऑस्ट्रेलियातील कॉफ्स हार्बर येथे झालेल्या कोस्टा नॉर्थ कोस्ट ओपन स्पर्धा जिंकली.
तिसरे मानांकन मिळालेल्या 16 वर्षीय अनाहतने महिला एकेरीच्या अंतिम फेरीत जपानच्या सहाव्या मानांकित अकारी मिदोरिकावाचा 3-0 (11-6, 11-6, 11-7) असा सरळ गेम्समध्ये पराभव केला. या संपूर्ण स्पर्धेत अनाहत जबदरस्त फॉर्म दाखवताना फक्त एक गेम गमविला. उपांत्य फेरीत तिने हाँगकाँगच्या सातव्या मानांकित किर्स्टी वाँगवर 3-1 (11-5, 7-11, 11-7, 11-9) अशी मात केली होती. त्याआधीच्या फेरीत तिने हाँगकाँगच्या बोबो लाम व हेलेन टँग यांचाही पराभव केला होता. पहिल्या फेरीत तिला बाय मिळाला होता.
यावर्षी तिने जेएसडब्ल्यू विलिंग्डन लिटल मास्टर्स व वरिष्ठांची स्पर्धा जानेवारीत जिंकली होती. त्यानंतर एप्रिलमध्ये तिने नॉर्दर्न स्लॅम पीएसए चॅलेंजर स्पर्धा जिंकली. याशिवाय एचसीएल स्क्वॅश टूरवरील चेन्नई व कोलकाता टप्पेही जिंकले तर ऑगस्टमध्ये रिलायन्स पीएसए चॅलेंजर 3 स्पर्धेतही तिने जेतेपद पटकावले होते.