केनेडीला धक्का देत अनाहत सिंग अजिंक्य अनाहत सिंग
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय युवा स्क्वॅशपटू अनाहत सिंगने चमकदार प्रदर्शन करीत अग्रमानांकित व जागतिक क्रमवारीत दहाव्या स्थानावर असणाऱ्या इंग्लंडच्या जॉर्जिना केनेडीचा धक्कादायक पराभव करून पीएसए कांस्यस्तरीय स्पर्धेचे पहिल्यांदाच जेतेपद पटकावले. वॉशिंग्टनमध्ये झालेल्या द स्क्वॅश ऑन फायर ओपन स्पर्धेत ती विजेती ठरली.
15 वर्षीय अनाहत सिंगचे हे आजवरचे सर्वात मोठे यश असून पीएसए टूरवरील तिचे एकंदर 15 वे जेतेपद आहे. अंतिम फेरीत तिने केनेडीचा 12-10, 11-5, 11-7 असा केवळ 26 मिनिटांत पराभव केला. अनाहत ही सध्या जागतिक क्रमवारीत 31 व्या स्थानावर आहे. यापूर्वी एकदा अनाहत व केनेडी यांची गाठ पडली होती आणि त्यावेळी केनेडीने विजय मिळविला होता. या स्पर्धेत सातवे मानांकन मिळालेल्या अनाहतने अंतिम लढतीत अतिशय संयमी प्रदर्शन करीत सलग चार गुण घेत 8-10 असे पिछाडीवर पडल्यानंतरही पहिला गेम घेतला. यानंतर मात्र अनाहतने सामन्यावर पूर्ण नियंत्रण राखले होते.
‘या यशाने मी खूप आनंदित आहे. या स्पर्धांत चांगली कामगिरी करून मानांकन वाढवण्याची माझी इच्छा होती आणि यासाठी उत्कृष्ट प्रदर्शन गरजेचे होते. यावेळी मला ते साध्य करता आले याचा मला आनंद आहे,’ असे अनाहत सामन्यानंतर म्हणाली.