अनाहत सिंग अंतिम फेरीत
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या ब्रिटीश खुल्या कनिष्ठांच्या स्क्वॅश स्पर्धेत भारताची टॉपसिडेड महिला स्क्वॅशपटू अनाहत सिंगने अंतिम फेरीत प्रवेश मिळविताना इजिप्तच्या मलिका अल कारेस्कायचा पराभव केला.
सदर स्पर्धा 19 वर्षांखालील वयोगटात खेळविली जात आहे. 17 वर्षीय अनाहत सिंगने आतापर्यंत पीएसए टूरवरील 12 स्पर्धा जिंकल्या आहेत. या स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या सामन्यात अनाहत सिंगने इजिप्तच्या मलिकाचा 11-8, 11-7, 11-9 अशा सरळ गेम्समध्ये केवळ 28 मिनिटांत फडशा पाडत अंतिम फेरी गाठली. ही स्पर्धा ब्रिटनमधील बर्मिंगहॅम विद्यापीठामध्ये खेळविली जात आहे. आता अनाहत सिंग आणि फ्रान्सची लॉरेन बेलेटेन यांच्यात जेतेपदासाठी लढत होईल. 2005 साली या स्पर्धेत भारताच्या जोश्ना चिन्नप्पाने विजेतेपद मिळविले होते. या स्पर्धेत मुलांच्या 17 वर्षांखालील वयोगटात भारताच्या द्वितीय मानांकित आर्यवीर दिवाणचे आव्हान उपांत्य फेरीत समाप्त झाले. इजिप्तच्या फिलोपॅथर सालेहने दिवाणचा 11-9, 11-5, 11-7 अशा गेम्समध्ये पराभव करत अंतिम फेरी गाठली.