वीज अभियंत्यास शोधून आणणाऱ्यास सहा महिन्यांचे बिल माफ
अज्ञाताने कार्यालयाच्या फलकावरच लावले पोस्टर
(साटेली भेडशी प्रतिनिधी)
साटेली - भेडशी येथील महावितरणचे शाखा कार्यालय मागील काही दिवसांपासून बंदच असून सहाय्यक अभियंता यांचाही पत्ता नसल्याने बेपत्ता असलेल्या सहाय्यक अभियंत्यांना शोधून आणणाऱ्यास ६ महिन्यांचे वीज बिल माफ केले जाईल अशा आशयाचा पोस्टर अज्ञाताने कार्यालयाच्या फलकावरच लावल्याने साटेली - भेडशी येथे हा चर्चेचा विषय बनला आहे . साटेली भेडशी येथील महावितरण शाखा कार्यालय सहाय्यक अभियंता हे आपल्या कार्यालयात नियमित गैरहजर असतात. बऱ्याचदा कार्यालय बंद असते . त्याबद्दल अनेक ग्राहकांच्या तक्रारी आहेत. त्यांच्या या कारभाराबद्दल अनेकदा संताप व्यक्त करण्यात आलेला आहे त्यांना जाब विचारण्यात आलेला आहे. मात्र त्यांच्या कारभारात कोणताही बदल झाला नसल्याने त्यांची येथून कायमस्वरूपी बदली करावी अशी मागणी होत आहे. तर मागील काही दिवसापासून ते कार्यालयात फिरकलेच नाहीत तर त्यांना संपर्क करण्यासाठी देण्यात आलेल्या मोबाईलवरही ते उत्तर देत नाही . त्याबद्दल अनेक ग्राहकांच्या विजेबाबत गैरसोयी निर्माण झाल्या असून यातीलच एका अज्ञात वीज ग्राहकाने आपला संताप व्यक्त करण्याच्या हेतूने साटेली भेडशी शाखा कार्यालयाच्या कार्यालयाच्या फलकावर सहा.अभियंता यांना शोधून आणणाऱ्यास सहा महिन्यांचे वीज बिल माफ करण्यात येईल अशा आशयाचा पोस्टर लावण्यात आला आहे . या पोस्टरमुळे मोठी चर्चा निर्माण झाली असून बऱ्याच दिवसापासून कार्यालयात नसलेले सहाय्यक अभियंता आता तरी येणार येतात काय याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.