एक भूमिगत संग्रहालय...
आपले जग अनेक अद्भूत वास्तू आणि वस्तूंनी भरलेले आहे. या वास्तू आणि वस्तू ईश्वरनिर्मितही आहेत आणि मानवनिर्मितही आहेत. भारताची राजधानी दिल्ली येथे एका भूमिगत वस्तूसंग्रहालयाची निर्मिती करण्यात आली आहे. 20 जुलै 2024 या दिवशी या संग्रहालयाचे उद्घाटन केंद्रीय संस्कृती मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांच्या हस्ते करण्यात आले होते. त्यावेळी हे वृत्त प्रसिद्धही झाले होते. तथापि, ही वास्तू विशेष कोणाच्या मनात त्यावेळी भरली नव्हती. आता मात्र, या संग्रहालयाची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली असून दिल्लीला गेलेली प्रत्येक व्यक्ती हे संग्रहालय पाहिल्यावाचून रहात नाही, अशी स्थिती बनली आहे .
हे वस्तूसंग्रहालय त्याची वैशिष्ट्यापूर्ण संरचना, वास्तूशास्त्रीय सौंदर्य आणि त्यातील प्राचीन वस्तूंचा संग्रह यासाठी प्रसिद्ध आहे. या वास्तूचे दर्शन घेतल्यानंतर आपल्या दृष्टीसमोर भारताचा 2,500 वर्षांचा इतिहास जणू जिवंत होऊन उभा राहतो, असा अनुभव अनेक दर्शकांनी कथन केला आहे. या संग्रहालयात 500 हून अधिक ऐतिहासिक कलाकृती ठेवण्यात आल्या असून त्यांना पाहून दृष्टीचे पारणे फिटते, अशी या संग्रहालयाला भेट देणाऱ्यांची प्रतिक्रिया असते.
हे भूमिगत संग्रहालय दिवसाचे केवळ तीन ते चार तासच दर्शकांसाठी उघडे ठेवले जाते. ते पाहण्यासाठी शुल्क आकारले जाते. प्रत्येकी 50 रुपयांच्या तीन अलग प्रवेश पत्रिका पाहणाऱ्याला घ्याव्या लागतात. तर या संग्रहालयाची तीन्ही भाग ज्यांना पहायचे आहेत, त्यांच्यासाठी 110 रुपयांची एक सामायिक प्रवेश पत्रिकाही उपलब्ध करुन देण्यात आली आहे. दिल्लीच्या परिसरात झालेल्या खोदकामातून गेल्या 2 हजार 500 वर्षांपूर्वीपासूनच्या ज्या ऐतिहासिक वस्तू हाती लागल्या आहेत आणि जी ऐतिहासिक माहिती मिळाली आहे, तिचा अत्यंत शास्त्रशुद्ध संग्रह आणि संकलन या वस्तूसंग्रहालयात उपलब्ध आहे. हे वस्तूसंग्रहालय केवळ कुतुहल म्हणून पाहणाऱ्यांसाठीच नव्हे, तर इतिहासाच्या आणि पुरातत्व शास्त्राच्या अभ्यासकांसाठीही ज्ञानाचे एक भांडारच आहे. साधारणत: 300 एकर परिसरात विस्तारलेल्या वस्तूसंग्रहालयात एक एलईडी पडदाही लावण्यात आला असून त्यावर या वस्तूसंग्रहालयातील ठेव्याचे जवळून दर्शन घेता येते. दिल्लीच्या ऐतिहासिक वैभवात या वस्तूसंग्रहालयाने मोलाची भर टाकली आहे.