For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सर्वसामान्यांच्या हक्कासाठी आवाज उठविणारी संघटना

10:40 AM Jul 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
सर्वसामान्यांच्या हक्कासाठी आवाज उठविणारी संघटना
Advertisement

तालुका म. ए. समिती : समितीच्या झेंड्याखाली एकत्र या : गाव संपर्क अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Advertisement

वार्ताहर /किणये

सीमाभाग हा मराठी बहुभाषिक भाग आहे. येथे मातृभाषेसाठी आवाज उठवावा लागतो, सीमालढा गेल्या 68 वर्षांपासून सुरू आहे. सध्या काहीजण राष्ट्रीय पक्षांना बळी पडू लागले आहेत. मात्र तालुक्यात समितीच्या माध्यमातून अनेक आंदोलने उभारण्यात आलेली आहेत. सर्वसामान्य शेतकरी व नागरिकांच्या हक्कासाठी म. ए. समिती ही आवाज उठविणारी तुमच्या हक्काची संघटना आहे. त्यामुळे समितीच्या झेंड्याखाली सर्वांनी एकत्र या आणि सीमाप्रश्नाच्या लढ्याला बळकटी देण्यासाठी प्रयत्न करा, असे माजी आमदार मनोहर किणेकर यांनी बेळवट्टी येथे सांगितले. तालुका म. ए. समिती यांच्यावतीने तालुक्याच्या विविध भागातील गावांना भेटी देऊन गाव संपर्क अभियान राबविण्यात येत आहे. या माध्यमातून प्रत्येक गावातील समितीच्या कार्यकर्त्यांची यादी तयार करण्यात येऊ लागली आहे. तसेच सीमा प्रश्नाबद्दल माहिती देण्यात येत आहे. बुधवारी पश्चिम भागातील बेळवट्टी व बिजगर्णी परिसरात समितीच्या नेते-मंडळींनी कार्यकर्त्यांशी चर्चा केली. यावेळी किणेकर बेळवट्टी गावात बोलत होते.

Advertisement

1956 साली भाषावार प्रांतरचना झाली व आपला मराठी बहुभाषिक भाग तात्कालीन म्हैसूर राज्यात डांबण्यात आला. तेव्हापासून सीमाप्रश्नांची लढाई सुरू आहे. यापूर्वी तालुक्यात समितीबद्दल जसे वातावरण होते त्या पद्धतीनेच आपण साऱ्यांनी मिळून सीमाप्रश्नासाठी कार्य केले पाहिजे, असे आर. के. पाटील यांनी सांगितले. बेळवट्टी भागातील समितीच्या सर्व कार्यकर्त्यांशी आपण संपर्क साधून म. ए. समितीच्या या अभियानाला पूर्णपणे प्रोत्साहन देणार असल्याचे बेळवट्टी गावच्यावतीने माजी तालुका पंचायत सदस्य एन. के. नलवडे यांनी सांगितले. यावेळी समितीच्या नेते-मंडळींनी समितीचे ज्येष्ठ नेते भुजंग गाडेकर यांचीही भेट घेऊन चर्चा केली. यावेळी समिती नेते आर. एम. चौगुले, अनिल पाटील, मोनाप्पा पाटील, अॅड. एम. जे. पाटील आदींसह बेळवट्टी येथील कार्यकर्ते उपस्थित होते. बिजगर्णी गावातील ब्रह्मलिंग मंदिरात बुधवारी  म. ए. समितीच्या कार्यकर्त्याची बैठक घेण्यात आली. अध्यक्षस्थानी ग्रामस्थ, पंच कमिटीचे अध्यक्ष वसंत अष्टेकर होते. शेतकऱ्यांच्या भू-संपादनाला व रिंगरोडला म. ए. समितीच्या माध्यमातून आवाज उठवून आंदोलने केली आहेत, असे आर. एम. चौगुले यांनी सांगितले. कल्लाप्पा भाष्कळ, प्रकाश भाष्कळ, मारुती अष्टेकर, सुरेश मोरे, सुरेश भाष्कळ, महादेव अष्टेकर आदी उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.