कारवार तालुक्यात भिंत कोसळून वृद्धा ठार
कारवार : तालुक्यात मौसमी पावसाचा मारा सुरूच आहे. कारवार तालुक्यात दमदार पावसामुळे एका दुकानाची भिंत कोसळून वृद्धा ठार झाल्याची घटना शुक्रवारी तालुक्यातील थोरलेबाग येथे घडली. रुकमा उर्फ गुलाबी मालसेकर (वय 70) असे त्या दुर्दैवी वृध्देचे नाव आहे. ही महिला घरी एकटीच राहत होती. कामानिमित्त ती बाहेर गेली होती. जोराचा पाऊस आल्यामुळे ती एका दुकाना शेजारी आडोशाला थांबली. यावेळी दुकानाची भिंत कोसळली व मातीच्या ढिगाऱ्याखाली सापडली. यामध्ये तिचा मृत्यू झाला. सदर घटनेची माहिती तहसीलदारांना देण्यात आली. तहसीलदार नरोन्हा आणि सदाशिवगड पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षकांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. पोलीस पुढील तपास करीत आहेत.
कारवारमध्ये 73.01 मि.मी. पावसाची नेंद
कारवार तालुक्यात दमदार पावसाने सुरुवात केली आहे. दरम्यान शुक्रवारी दिवसभर 73.1 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. 1 जूनपासून 28 जून अखेरपर्यंत कारवार तालुक्यात 866 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. कारवार तालुक्याच्या पूर्व भागात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे काळी नदीवरील कद्रा जलाशयाच्या पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. जलाशयात 12 हजार 931 क्युसेक्स इतके पाणी वाहून येत आहे. कद्रा जलाशयात कमाल पाण्याची पातळी 34.50 मीटर इतकी आहे. जिल्हा प्रशासनाने जलाशयात साठविण्यात येणाऱ्या पाण्यावर निर्बंध घातले असून ही पातळी 31 मीटर इतकी केली आहे. शुक्रवारी धरणाच्या पाणी पातळीत 29.95 मीटर इतकी झाली आहे.