Kolhapur : दत्तवाड येथे नदीत आंघोळीला गेलेल्या वृद्धाचा मगरीच्या हल्ल्यात मृत्यू
दत्तवाडमध्ये मगरीचा घातक हल्ला
कुरुंदवाड : दत्तवाड (ता. शिरोळ) येथे दूधगंगा नदी पात्रात आंघोळीस गेलेल्या लक्ष्मण कलगी (वय ६५) या वृद्धाला मगरीने ओढून ठार केल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. ते जिल्हा मध्यवर्ती बँकेचे निवृत्त कर्मचारी होते. या दुर्घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
कलगी नेहमीप्रमाणे हे आपल्या मित्रांसोबत सकाळी दूधगंगा नदीत आंघोळीसाठी गेले होते. सर्वजण आंघोळ करून वर येत असताना कलगी हे टॉवेल घेण्यासाठी नदीकाठाकडे जात होते. त्याचवेळी अचानक पाण्यात दबा धरून बसलेल्या मगरीने त्यांच्या पायाला जबर चावा घेत पाण्यात ओढून नेले. ही घटना इतकी झपाट्याने घडली की त्यांच्या सोबत असणाऱ्यांच्या लक्षात येईपर्यंत ते खोल पाण्यात खेचले गेले.
घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी त्वरित मदतकार्य सुरू करत काही वेळातच कलगी यांना नदीतून बाहेर काढले. मात्र त्यावेळी ते गंभीर जखमी अवस्थेत असूनही बेशुद्ध होते. दतवाड ग्रामीण रुग्णालयात तत्काळ हलवण्यात आले, परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.
दरम्यान, दूधगंगा नदी परिसरात मगरींबाबतचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. येथील ग्रामस्थांनी नदीकाठ परिसरात जाळी, सूचना फलक आणि सुरक्षेबाबत कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने तातडीने दक्षता घेऊन अशा अपघातांना आळा घालावा, अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून होत आहेत.