Riteish Deshmukh | सांगलीत उसळला चाहत्यांचा जनसागर! रितेश देशमुखच्या 'त्या' एका वाक्याने सांगलीकर झाले भावूक
शिवतीर्थावर रितेश देशमुखच्या स्वागतासाठी हजारोंची गर्दी
सांगली - अभिनेता बॉलिवूडचा लाडका रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख यांना पाहण्यासाठी शिवतीर्थावर हजारो सांगलीकरांनी अक्षरशः गर्दीचा महासागर उसळला होता. चाहत्यांचा जल्लोष, घोषणांचा गजर आणि उस्फूर्त स्वागत पाहून रितेश देशमुख भारावून गेला. 'सांगलीकरांचे प्रेम पाहून मला लातूरला माझ्या घरी आल्यासारखे वाटते,' अशा भावनिक शब्दांत त्याने भावना व्यक्त केल्या.
रितेश आणि जेनेलिया यांच्या आगमनासाठी चाहत्यांनी तब्बल दोन तासांहून अधिक काळ प्रतीक्षा केली. रात्री साडेसातच्या सुमारास रितेश व्यासपीठावर दाखल होताच पुष्पवृष्टी करण्यात आली. 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' आणि 'हर हर महादेव'च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. यावेळी रितेशने क्रेनमधून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले.
चाहत्यांशी संवाद रितेश म्हणाला, 'छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकण्यासारखे खूप काही आहे. महाराजांनी स्वाभिमानाने जगायला शिकवले. मोठी झेप घ्यायची असेल तर दोन पावले मागे जाण्याची शिकवणही त्यांनी दिली.
सांगलीत आल्यानंतर तुमचा उत्साह आणि प्रेम पाहून मन भरून आले. 'यावेळी शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानतर्फे रितेश देशमुख यांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्यानंतर उघड्या जीपमधून काढण्यात आलेल्या भव्य रॅलीत तो सहभागी झाला. रॅली मार्गावर ठिकठिकाणी नागरिकांनी गर्दी करत रितेशचे जल्लोषात स्वागत केले. रितेशनेही हात उंचावत चाहत्यांच्या प्रेमाला प्रतिसाद दिला.
जेनेलियाच्या एका झलकसाठी चाहत्यांची वावपळ
रितेश मोटारीत बसल्यानंतर गाडीच्या टपामधून जेनेलियाने बाहेर येत चाहत्यांना अभिवादन केले. तिची एक झलक पाहताच उपस्थितांमध्ये एकाच जल्लोष उसळला. अनेकांनी मोबाईलचे कॅमेरे उंचावत हा खास क्षण टिपण्यासाठी धडपड केली.
प्रशासनही तब्बल ६ तास खोळंबले
रितेश आणि जेनेलिया यांच्या आगमनासाठी पोलीस प्रशासनाने ही जव्यत तयारी केली होती. दुपारी तीन वाजल्यापासून वाहतूक नियोजनासाठी प्रशासन ताटकळून होते.