महाकुंभ दुर्घटनेची चौकशी आवश्यकच
प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यात बुधवारी झालेली चेंगराचेंगरी ही खरोखरच दुर्दैवी दुर्घटना आहे. या दुर्घटनेत 30 भाविकांचा मृत्यू झाला, ज्यांच्यात बेळगावच्याही चार भाविकांचा समावेश आहे. या घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याचा आदेश उत्तर प्रदेश सरकारने दिला आहे. ही घटना ज्या परिस्थितीत घडली, तिचा विचार करता सखोल चौकशी आवश्यकच ठरते. महाकुंभासारख्या महोत्सवात कोट्यावधी नागरिक एका स्थानी येतात. थोडीशी जरी गडबड झाली तरी अशावेळी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता असतेच. अनेकदा तसे घडलेले आहे. प्रयागराज येथील दुर्घटना कशी घडली, यासंबंधी बऱ्याच शक्यता व्यक्त केल्या जात आहेत. अफवा पसरविल्याने लोकांचा गोंधळ उडाला आणि चेंगराचेंगरी झाली, या कारणाची मोठी चर्चा होत आहे. दुर्घटनेच्या स्थानी असणारे पाच अधिकारी उत्तरदायी आहेत, असेही वृत्त काही प्रसारमाध्यमांनी प्रसारित केले आहे. हे वृत्त खरे असेल, तर त्यांची कसून चौकशी होणे आवश्यक आहे. एका अधिकाऱ्याने येण्याजाण्याचे मार्ग असणारे सेतू (पूल) बंद केले आणि अन्य एका अधिकाऱ्याने मध्यरात्री झोपेत असलेल्या भाविकांना जागे करुन चेंगराचेंगरी होणार असल्याचा इशारा दिला. त्यामुळे लोकांची गडबड उडाली आणि त्यामुळे हा प्रसंग ओढवला, असेही वृत्त काही माध्यमांनी दिले आहे. कोणतीही मोठी घटना घडली की समाजमाध्यमांवरुन अशा वृत्तांची माळच लावली जाते. पण प्रत्येक वृत्त विश्वासार्ह असतेच असे नाही. म्हणूनच ही घटना हा अपघात आहे, बेजबाबदारपणा आहे, की घातपात आहे, याची चौकशी त्वरित होण्याची आवश्यकता आहे. मृत्यू किती झाले ही महत्त्वाची बाब अशावेळी नसते. एका भाविकाचा जरी मृत्यू झाला, तरी तो गंभीरच मानला पाहिजे. चेंगराचेगरी आणि तुडवातुडवीला प्रारंभ झाल्यानंतर, तेथील प्रशासनाने अर्ध्या तासात स्थिती नियंत्रणात आणली असे दिसून येते. त्यामुळे मोठ्या प्रमाणातली जीवीत हानी टळली. ज्या घाटावर ही घटना घडली, तो त्वरित रिकामा करण्यात आला. काहीकाळ ‘अमृतस्नान’ थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाला विविध आखाड्यांच्या प्रमुखांनीही व्यक्तीगत मानापमान बाजूला ठेवून पाठिंबा दिला. परिस्थिती सुरळीत झाल्यानंतर पुन्हा अमृतस्नानाला प्रारंभ करण्यात आला. प्रसंगावधान राखून तेथील अधिकारी आणि पोलिसांनी अनेक योग्य निर्णय घेतले असे दिसून येत आहे. राष्ट्रीय आपदा साहाय्यता दलाची पथकेही नजीकच होती. त्यामुळे संबंधित स्थानी त्वरित साहाय्यता पोहचविणे शक्य झाले होते. त्यामुळे जीवीतहानी नियंत्रणात ठेवणे प्रशासनाला साध्य झाले असावे. तरीही 30 ही मृतांची संख्या लहान नाही. त्यामुळे या घटनेला नेमक्या कोणत्या त्रुटी कारणीभूत आहेत, हे शोधणे अत्यावश्यक आहे. हा अपघात असेल तर त्याची कारणे कोणती हे शोधले पाहिजे. तसेच घातपात असेल तर त्याची पाळेमुळे खणून काढून त्याला कारणीभूत असणाऱ्यांना कठोरातील कठोर शिक्षा त्वरित मिळवून देणे, हे प्रशासनाचे कर्तव्य आहे. अशा प्रचंड गर्दीच्या स्थानी जाणाऱ्यांनीही काही पथ्ये पाळणे आवश्यक असते. अफवांना बळी पडून स्वत:चा गोंधळ करुन न घेता शांतपणे हालचाली केल्यास स्थिती नियंत्रणात राहू शकते आणि हानी टाळता येते किंवा कमीतकमी राखता येते. प्रशासनाने स्पष्ट केलेले नियम पाळणे अत्यंत महत्त्वाचे ठरते, असे या प्रसंगाच्या संदर्भात बोलले जात आहे. अर्थात, नियम पाळूनही कित्येकदा अशा घटना टाळता येत नाहीत, ही बाबही खरीच आहे. तसेच अशा स्थितीत सर्वसामान्यांचा फारसा दोष नसतो कारण अफवा कोणत्या आहेत आणि खरी स्थिती काय आहे, हेच कित्येकदा समजू शकत नाही. ते समजून घेण्याइतका वेळही मिळत नाही. आला जीव वाचविण्यासाठी प्रत्येकजण धडपड करायला जातो आणि त्यातून गोंधळ निर्माण होतो. गेल्या 75 वर्षांमध्ये कुंभमेळ्यांमध्ये चार-पाचवेळा अशा दुर्घटना घडल्या आहेत आणि अनेक भाविकांना प्राणांस मुकावे लागले आहे. यंदाचा महाकुंभाचा योग 144 वर्षांनंतर प्रथमच आला आहे. त्यामुळे ही पर्वणी साधण्यासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या अतिप्रचंड आहे. ही स्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने योग्य व्यवस्था ठेवण्याचा प्रयत्न केला आहे, हेही एकंदर आढावा घेता दिसून येत आहे. पण कित्येकदा प्रशासनाचेही प्रयत्न तोकडे पडतात. प्रचंड संख्येसमोर व्यवस्था अपुरी पडते. मक्केत होणाऱ्या आणि मुस्लीमांसाठी अत्यंत पवित्र असणाऱ्या हाजच्या यात्रेतही अशा दुर्घटना अनेकदा झालेल्या आहेत. पण प्रत्येक दुर्घटनेच्या करणांचा शोध घेऊन पुढच्या वेळी त्या त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न करण्याचे काम प्रशासनाकडून होणे आवश्यक आहे. त्यामुळे बुधवारच्या या दुर्घटनेची चौकशी करुन खऱ्या कारणांचा शोध घ्यावा आणि जर हेतुपुरस्सर असे घडविण्यात आले असेल तर, ‘एक घाव, दोन तुकडे’ या पद्धतीने अशा समाजकंटकांवर किंवा दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करावी, अशी लोकांची अपेक्षा आहे. हा अपघात असेल, तर त्याची कारणे शोधून ती जनतेसमोर स्पष्टपणे मांडली पाहिजेत. कारण, अशा दुर्घटना घडत असल्या, तरी त्या आपोआप घडत नाहीत. काहीना काही त्रुटी राहून गेलेली असतेच. तेव्हा, अशा घटनांचे राजकारण न करता त्याच्यातून भविष्यकाळासाठी धडा शिकणे आवश्यक आहे. हा महाकुंभमेळा आणखी महिनाभर चालणार आहे. या कालावधीत तरी या दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, याची दक्षता बाळगणे प्रशासन आणि भाविक या दोघांसाठीही आवश्यक आहे. सुदैवाने, बुधवारच्या घटनेची व्याप्ती फार मोठी नव्हती. पण यामुळे प्रशासनाने आपली पाठ थोपटून घ्यावी, अशी परिस्थिती नाही. कारण अद्याप किमान महिनाभर प्रशासनाला डोळ्यात तेल घालून काम करावे लागणार आहे. तसेच भाविकांनीही सर्व भार केवळ प्रशासनावर न टाकता, नियमांचे काटेकोर पालन करणे आणि कोणतीही हालचाल सुरक्षितपणे करण्याची आणि विनाकारण धोका न पत्करण्याची आवश्यकता आहे. प्रशासन आणि भाविक यांनी एकमेकांना सहकार्य केल्यास निश्चितपणे पुढचा एक महिना विनाअडथळा आणि सुलभतेने हा महाकुंभमेळा पार पडणे शक्य आहे.