For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

फणसवडे बचत गटातील महिलांना दिवाळी भाऊबीज भेट

11:18 AM Nov 15, 2023 IST | अनुजा कुडतरकर
फणसवडे बचत गटातील महिलांना दिवाळी भाऊबीज भेट
Advertisement

पदवीधर शिक्षक डॉ चंद्रकांत सावंत यांचा उपक्रम

Advertisement

ओटवणे प्रतिनिधी

ओवळीये गावचे सुपुत्र, आंबोली निवासी तथा नाणोस शाळा नं. १ चे पदवीधर शिक्षक डॉ चंद्रकांत तुकाराम सावंत यांनी अतिदुर्गम फणसवडे गावातील श्री देव मल्लनाथ महिला बचत गटातील १३ महिलांना दीपावलीनिमित्त प्रत्येकी ५०० रुपयाची भाऊबीज भेट दिली.
दोन वर्षांपूर्वी दिवाळीतच आर्थिक परिस्थिती अभावी कर्ज फेडू न शकलेल्या याच गावातील १६ महिलांचे एकूण ५ लाख ३५ हजार ५२५ रुपयाचे कर्ज त्यांनी स्वतः भरून या महिलांना कर्ज मुक्त करीत अनोखी भाऊबीज भेट दिली होती.

Advertisement

डाॅ. चंद्रकांत सावंत २५ वर्षांपूर्वी या अतिदुर्गम फणसवडे गावातील शाळेत मुख्याध्यापक असताना ग्रामस्थांच्या सहकार्याने या शाळेला जिल्हा परिषदेचा आदर्श प्राथमिक शाळा पुरस्कार प्राप्त झाला. त्याचवेळी त्यांनी या दुर्गम गावातील महिलांना संघटीत करून बचत गट ही संकल्पना राबवून यशस्वीही केली. त्यांच्या व्यवस्थापनाखाली या गावात दहा बचत गट कार्यरत आहेत. या बचत गटातील सर्व महिला दरमहा २५ रूपये जमा करतात. बचतीच्या या व्याजातून गेल्या नऊ वर्षांपासून या महिला बचत गटांचा भाऊबीज हा आगळा वेगळा उपक्रम सुरु आहे. दरवर्षी कार्यरत प्रत्येक महिलांना भाऊबीज दिली जाते. याच व्याजाच्या उर्वरीत रकमेतून गावात शैक्षणिक व विधायक उपक्रम राबविले जातात. हे उपक्रम जिल्ह्यातील महिला बचत गट संकल्पनेला आदर्शवत व प्रोत्साहन देणारे आहेत.

यावेळी श्री मल्लनाथ महिला बचत गटाच्या अध्यक्षा सौ विजया विजय गावडे, उपाध्यक्षा सौ रत्नप्रभा चंद्रकांत गावडे, सचिव सौ रोहिणी संजय गावडे, सदस्या सौ लक्ष्मी गंगाराम गावडे, श्रीम गीता काशिनाथ गावडे, सौ सावित्री सत्यवान गावडे, सौ सुमित्रा एकनाथ गावडे, सौ शुभांगी सूर्यकांत गावडे, सानिया विजय गावडे आदी महिला उपस्थित होत्या.

डॉ चंद्रकांत सावंत यांनी सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेंतर्गत जिल्ह्यातील ७८ शाळांमधील १३० विद्यार्थीनी दत्तक घेत ४ लाख १५ हजार रुपये कायमस्वरूपी देणगी दिली. या देणगीच्या व्याजातून दरवर्षी त्या शाळेतील १३० मुलींचा कायमस्वरुपी शैक्षणिक खर्च करण्यात येणार आहे. तसेच डॉ चंद्रकांत सावंत यांनी गेली दोन दशके विविध शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा उपक्रमांसाठी स्वतः पदरमोड करून लाखो रुपये खर्च केले आहेत.

Advertisement
Tags :

.