2 देशांचा हिस्सा असणारे भारतीय गाव
गाव प्रमुखाला 60 पत्नी, लोकांकडे दुहेरी नागरिकत्व
भारतात एक असे गाव आहे, जे भारतासह अन्य देशाचाही हिस्सा आहे. याचमुळे या गावातील लोकांकडे दुहेरी नागरिकत्व आहे. नागालँडमधील एका गावात एक अनोखा समुदाय राहतो.
नागालँडचे लोंगवा गाव स्वतःच्या अनोख्या वैशिष्टय़ामुळे अत्यंत लोकप्रिय आहे. या गावात कोन्याक समुदायाचे वास्तव्य आहे. हे गाव भारतासह म्यानमारचाही हिस्सा आहे. सीमा या गावाच्या प्रमुख आणि समुदायाचा अध्यक्ष म्हणजेच राजाच्या घरातून जाते. याचमुळे राजा स्वतःच्या घरात म्यानमारमध्ये जेवतो आणि भारतात झोपतो असे म्हटले जाते. राजाला तेथे ‘अंघ’ म्हटले जाते आणि त्याला 60 पत्नी आहेत. तो स्वतःच्या गावासह म्यानमार, नागालँड आणि अरुणाचल प्रदेशच्या 100 गावांचाही राजा आहे.
शिरच्छेदाची होती प्रथा
कोन्याक समुदायाला हेडहंटर म्हटले जायचे. हेडहंटर म्हणजेच या समुदायाचे लोक परस्परांचा शिरच्छेद करत ते स्वतःसोबत घेऊन जायचे आणि ते घरात सजवून ठेवायचे. परंतु 1960 च्या काळापासून या भागात ख्रिश्चन धर्माचा प्रसार झाल्याने ही प्रथा हळूहळू संपुष्टात आली. गावात सुमारे 700 घरे असून या समुदायाची लोकसंख्या अन्य समुदायांच्या तुलनेत अधिक आहे. ग्रामस्थ सहजपणे एका देशातून दुसऱया देशात हिंडत असतात.
पासपोर्ट-व्हिसा नको
कोन्याक लोक स्वतःच्या चेहऱयावर आणि शरीराच्या अन्य भागांवर टॅटू काढून घेतात. याचमुळे ते परिसरातील अन्य समुदायांपेक्षा वेगळे भासतात. टॅटू आणि हेडहंटिंग त्यांच्या प्रथांचा महत्त्वाचा हिस्सा आहे. समुदायाच्या राजाचा मुलगा म्यानमार सैन्यात भरती आहे. लोकांना दोन्ही देशांमध्ये ये-जा करण्यासाठी व्हिसा-पासपोर्टची गरज भासत नाही. हा समुदाय नागमिस भाषा बोलतो, ही भाषा नागा आणि आसामी भाषेला मिळून तयार झाली आहे.