माय -लेकाची ताटातूट ; माय रडकुंडीला, अन् दीड तासानंतर दोघांची भेट
ओटवणे प्रतिनिधी
कामाच्या शोधात जळगाव येथुन सावंतवाडीत आलेली वृद्ध महिला व तिचा मुलगा या दोघांची काही काळ ताटातुट झाली. या वृध्द मायमाऊलीने मुलाच्या शोधात दोन मोठ्या बॅगासह सावंतवाडी स्टँडचा परिसर पिंजून काढूनही मुलाचा पत्ताच नाही. त्यानंतर ही वृद्धा मुलाला हाका मारून अक्षरशः रडकुंडीला आली. अखेर सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान या वृध्देच्या मदतीला धाऊन आली. त्यांनतर पोलिसांच्या मदतीने या
वृद्धेसह तिच्या मुलाला त्यांच्या जळगाव गावी पाठविण्याची व्यवस्था केली. कामाच्या शोधात गेले तीन दिवसांपूर्वी सावंतवाडी आलेली ही वृद्ध महिला व तिचा मुलगा बस स्टँडवरच राहत होते. शनिवारी दुपारी एकच्या सुमारास त्या वृद्ध महिलेचा मुलगा तिला स्टँडवरच सोडून गेला तो तास दिड तास परतलाच नाही. त्यामुळे ही वृद्ध महिला आपल्या मुलाला हाका मारून रडत होती. त्यानंतर सोबतच्या दोन जड बॅगा घेऊन ही वृद्धा रडत रडत मुलाला शोधण्यासाठी सावंतवाडी स्टँडच परिसरात फिरत होती.
नेमक्या याचवेळी ही हताश वृद्धा सामाजिक बांधिलकीचे कार्यकर्ते रवी जाधव यांच्या दृष्टीस पडली. त्यांनतर त्यांनी वृद्ध महिलेजवळ जाऊन तिची विचारपूस करून सर्व माहिती घेतली. त्यानंतर तिच्या हातातील दोन्ही बॅगा घेऊन तिला बस स्टॅन्डवर बसवले. त्यानंतर त्वरीत सावंतवाडी पोलीस बीट हवालदार पि. के कदम यांना फोन केला. त्यानंतर पोलीस स्टेशनचे बीट हवालदार महेश जाधव तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. या वृद्धेच्या मुलाचा शोध सुरू असतानाच तो एक दिड तासानंतर स्टँडवर आला. त्यानंतर बीट हवालदार महेश जाधव यांनी या वृद्धेच्या मुलाकडून सर्व माहिती घेऊन या दोघांनाही लगेच त्यांच्या जळगाव या गावी पाठवण्याची व्यवस्था केली. त्यामुळे या वृद्धेसह मुलाने सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानसह पोलिसांचे आभार मानले.