For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारत-ऑस्ट्रेलियासाठी हे एक विलक्षण वर्ष

06:58 AM Nov 21, 2023 IST | Tarun Bharat Portal
भारत ऑस्ट्रेलियासाठी हे एक विलक्षण वर्ष
Advertisement

एस. जयशंकर यांचा दावा : भारत-ऑस्ट्रेलिया ‘टू प्लस टू’ चर्चेत विविध मुद्यांवर चर्चा

Advertisement

► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टू प्लस टू मंत्रिस्तरीय चर्चेदरम्यान सोमवार, 20 नोव्हेंबर रोजी संरक्षण सहकार्य वाढवणे, महत्त्वपूर्ण खनिजे, व्यापार आणि गुंतवणूक यासारख्या क्षेत्रातील धोरणात्मक संबंधांसह अनेक मुद्यांवर चर्चा झाली.  दोन्ही देशांमधील आर्थिक सहकार्य वाढत असून चालू वर्ष द्विपक्षीय संबंध वृद्धिंगत ठरण्याच्यादृष्टीने विलक्षण असल्याचा दावा परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी केला आहे. मंत्रिस्तरीय चर्चेनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना यासंबंधी माहिती दिली.

Advertisement

संरक्षणमंत्री राजनाथ सिंग आणि परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर टू प्लस टू मंत्रिस्तरीय चर्चेत भारताच्या वतीने उपस्थित होते. यामध्ये या दोघांनी ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान आणि संरक्षण मंत्री रिचर्ड मार्लेस आणि परराष्ट्रमंत्री पेनी वाँग यांची भेट घेऊन चर्चा केली.

आमच्या संबंधांसाठी हे एक विलक्षण वर्ष आहे. आर्थिक सहकार्य आणि व्यापार करार गेल्या डिसेंबरमध्ये अंमलात आल्यानंतर त्याचे आर्थिक परिणाम यावषी दिसू लागले आहेत. भारतीय समुदायातील एक दशलक्षाहून अधिक व्यक्ती आणि एक लाखाहून अधिक भारतीय विद्यार्थ्यांनी दोन्ही देशांमध्ये एक नवे नाते जोडल्याचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी स्पष्ट केले.

ऑस्ट्रेलियाने काय म्हटले?

दोन्ही देशांचा इतिहास सामायिक आहे. आम्ही लोकशाही परंपरा सामायिक करतो. आम्ही कायद्याचे राज्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य यांची जपणूक करतो. चीन आमचा सर्वात मोठा व्यापारी आणि सुरक्षा भागीदार आहे. मात्र, आता भारतासोबतही आम्ही सागरी क्षेत्रात सहकार्य आणि राजनैतिक सहकार्याच्या मार्गांबद्दल अधिक करार करण्यास उत्सुक आहोत, असे ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान रिचर्ड मार्ल्स म्हणाले.

संरक्षण आणि सुरक्षा, व्यापार आणि गुंतवणूक, महत्त्वपूर्ण खनिजे, ऊर्जा, हवामान बदल, विज्ञान आणि तंत्रज्ञान, अंतराळ, शिक्षण आणि लोकांशी संपर्क यासह बहुआयामी भारत-ऑस्ट्रेलिया संबंध अधिक दृढ करण्यावर दोन्ही देशांच्या नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी सांगितले. दोन्ही देशांमध्ये विचारांची देवाणघेवाण झाली असून प्रादेशिक आणि जागतिक समस्या यावरही चर्चा झाल्याचे सांगण्यात आले.

Advertisement
Tags :

.