दापोली तालुक्यात ३५० झाडांच्या पुनर्लागवडीचा प्रयोग
दापोली / मनोज पवार :
पर्यावरणाचा समतोल ढासळत असल्याने झाडे लावण्याची गरज आहे. आहे ती वृक्षसंपदा जतन करण्याची गरज आहे. मात्र विकास देखील व्हायला हवा या उद्देशाने दापोली ते विसापूर फाटा या रस्त्याच्या रुंदीकरणात येणाऱ्या तब्बल ३५० मोठ्या वृक्षांचा पुनर्लागवडीचा प्रयोग यशस्वी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. यामुळे समाधानाचे वातावरण आहे.
दापोली सध्या पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्रबिंदू बनलेले आहे. यामुळे मुंबई पुणे येथून मोठ्या प्रमाणात पर्यटक दापोलीत येत असतात. मात्र दापोलीत येणाऱ्या रस्त्यांची रुंदी कमी आहे. शिवाय रस्त्यांची अवस्था देखील खराब झालेली आहे. यामुळे दापोली ते विसापूर फाटा या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम हाती घेतले.
२४ किलोमीटरच्या या रस्त्यावर दुतर्फा ७२५ झाडे रुंदीकरणाला बाधित होत होती. यामुळे ही झाडे तोडून न टाकता शासनाच्यावतीने ही झाडे जेसीबी व क्रेनच्या सहाय्याने समूळ उपटून तिथेच थोड्या अंतरावर पुन्हा मोठा खड्डा करून लावण्यात येत आहेत. दापोली ते विसापूर फाटा या मार्गावर अशा प्रकारे ३५० मोठ्या झाडांची पुनर्लागवड करण्यात आली आहे. हे काम सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वतीने एमएसआयडीसीकडे वर्ग करण्यात आलेले आहे. याचे प्रत्यक्ष काम हे केटीआयसी ही कंपनी करत आहे. तर मोठ्या झाडांची पुनर्लागवड व त्यांची जोपासना करण्याचे काम घोरपडे असोसिएट यांच्याकडे देण्यात आल्याची माहिती बांधकाम विभागाने दिली.