एक उद्भोधक उदाहरण
आज साऱ्या जगाला ‘लठ्ठ’पणाची समस्या भेडसावत आहे. भारतातही या समस्येने चांगलाच जोर धरला आहे. बैठे काम, व्यायामाचा अभाव आणि केवळ चव डोळ्यांसमोर ठेवून बनविलेले आणि भरपूर खाल्ले जाणारे फास्ट फूड यामुळे वजन वाढण्याची समस्या अनेकांच्या अनारोग्याचे कारण बनली आहे. तथा पि, निर्धार असेल आणि सातत्यपूर्ण कष्ट करण्याची इच्छाशक्ती असेल, तर अशा समस्यांवर कोणताही महागडा किंवा कृत्रिम उपाय न करता त्या नियंत्रणात आणता येतात, हे ब्रिटनमधील जॉर्ज फरेरा नामक युवकाने दाखवून दिले आहे.

जॉर्ज फरेरा यांचे वजन दोन वर्षांपूर्वी 254 किलोग्रॅम होते. त्यांना चालता येणेही अशक्य झाले होते. अतिआहार आणि व्यायाम किंवा शारिरीक हालचालींकडे दुर्लक्ष या चुकांमुळे त्यांचे वजन असे प्रचंड प्रमाणात वाढले होते. त्यांना डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करुन वजन कमी करण्याचा सल्ला दिला होता. आपल्या प्रचंड वजनामुळे जॉर्ज फरेरा यांची प्रकृती ढासळू लागली होती आणि लवकरात लवकर काही प्रखर उपाययोजना केली नाही, तर त्यांना अधिकच त्रास होणार आहे, असे त्यांच्या डॉक्टरांनी त्यांच्याकडे निक्षून स्पष्ट केले होते. त्यामुळे आता काहीना काही उपाय करणे भाग होते. फरेरा यांनी शस्त्रक्रिया करुन घेण्यास नकार दिला. त्यांनी एक फुटबॉल क्लबचे सदस्यत्व घेतले आणि ते फुटबॉल खेळण्यासाठी प्रतिदिन मैदानात जाऊ लागले. तथापि, बराच काळ त्यांना पळणे सोडाच, पण साधे चालणेही अशक्य होत होते. तरीही त्यांनी धीर सोडला नाही. त्यांच्या सहकाऱ्यांनाही त्यांना मनापासून साहाय्य केले. काही दिवसांच्या नंतर ते फुटबॉल खेळण्याइतके सक्षम झाले. खेळासमवेत त्यांनी आपल्या आहारपद्धतीतही मोठे परिवर्तन केले. त्यांनी फास्ट फूड किंवा जंक फूड पूर्णत: सोडून दिले आणि आरोग्याला अनुकूल होईल, असा साधा आहार घेण्यास प्रारंभ केला. प्रारंभीचा काळ त्यांना या नव्या सवयींचा पुष्कळ त्रास झाला. तथापि त्या अंगवळणी पडल्या. अवघ्या दोन वर्षांच्या अथक आणि सातत्यपूर्ण परिश्रमांच्या नंतर आज त्यांचे वजन 114 किलोंनी कमी झाले असून त्यांची कार्यक्षमता मोठ्या
प्रमाणात वाढली आहे. त्यांचे हे उदाहरण अशा समस्यांशी दोन हात करणाऱ्यांसाठी अत्यंत उद्बोधक आहे.