आत्मज्ञानी योग्याला सर्व ब्रह्मव्याप्त दिसत असतं
अध्याय तिसरा
बाप्पा म्हणाले, जो कोणी ईश्वराने दिलेलं काम करून स्वस्थ राहील तो समाधानी आयुष्य घालवेल कारण ते काम त्याचा उदरनिर्वाह चालेल एव्हढंच असतं. त्याने पार पडलेल्या कर्तव्यकर्मातून त्याला कोणतेही बंधन लागू होत नाही. तो करत असलेले कर्म केवळ कर्तव्य म्हणून तो करत असतो. सदासर्वदा नि:संग असलेल्या आत्मज्ञानी माणसाची शरीरयात्रा प्रारब्धकर्मानुसार यंत्रवत चालू असते.
वस्तूचा संग्रह करण्याचा इरादा नसल्याने वस्तूची प्राप्ती, रक्षण, वृद्धी ह्यासाठी प्रयत्न करायची गरज भासत नसल्यामुळे त्याची कर्मे कोणत्याही पाप पुण्याची निर्मिती न करता लय पावतात. हे ज्ञान झाल्यावर जगात वागायचं कसं हे ज्याला कळलंय आणि जो त्याप्रमाणे वागतो त्याला विज्ञान समजलंय असं म्हणायला हरकत नाही. अशा ज्ञानविज्ञान युक्त मनुष्याने केलेली कर्मे त्याला बाधू शकत नाहीत. तो ईश्वराचे सगुण रूप असतो.
पुढील श्लोकात बाप्पा सांगतायत की, असा मनुष्य कर्म केवळ एक पवित्र गोष्ट म्हणून करत असतो. म्हणून बाप्पा त्याला यज्ञाची उपमा देतात. त्याला सर्व ब्रह्मव्याप्त दिसत असतं.
अहमग्निर्हविर्होता हुतं यन्मयि चार्पितम् ।
ब्रह्माप्तव्यं च तेनाथ ब्रह्मण्येव यतो रत ।।30।।
अर्थ- अग्नि, हवन करावयाचे द्रव्य जे माझ्यामध्ये अर्पण केलेले द्रव्य आणि यज्ञाचे प्राप्तव्य जे ब्रह्म ते सर्व मी आहे. ज्ञानी मनुष्य ब्रह्माचे ठिकाणी रममाण होतो.
विवरण- निष्काम कर्मयोग्याच्या मन:स्थितीचे बाप्पांनी येथे वर्णन केले आहे. यज्ञ हे पवित्र कर्माचे प्रतीक आहे. यज्ञासाठी अग्नी, अग्नीला अर्पण करायची वस्तू, द्रव्य आणि यज्ञ करण्याचे उद्दिष्ट ह्या गोष्टी लागतात. जो निरपेक्षतेनं यज्ञ करत असतो त्याला वरील सर्व गोष्टी ब्रह्ममय वाटतात. त्याप्रमाणे कर्मयोग्याला कर्म, ते करायची पद्धत, त्यासाठी आवश्यक ती साधनं हे सर्व ईश्वरस्वरूप वाटतं. तो स्वत:ला कर्ता समजत नसल्याने ईश्वराने नेमून दिलंय ते कर्म ईश्वरस्वरूप समजून करायचं एव्हढंच त्याला माहीत असतं आणि ही खात्रीही असते की ईश्वर हा सर्वश्रेष्ठ असून तो स्वत: वरिष्ठ कर्मयोगी असल्याने त्याला माझ्याकडून काहीही नको आहे. माझ्यावरच्या प्रेमापोटी तो माझ्याकडून करून घेत असलेलं कार्य, माझ्यासाठी हितकर आहे.
असा विचार करून ईश्वरानं दिलेलं कर्म यज्ञासारखं पवित्र समजून तो काम करण्यास सुरुवात करण्यापूर्वी, करत असताना आणि पूर्ण झाल्यावर या तिन्ही अवस्थेत ईश्वराचं स्मरण करत आनंद सागरात डुंबत असतो.
पुढील श्लोकात बाप्पा योगी करत असलेल्या यज्ञाचे निरनिराळे प्रकार सांगत आहेत.
योगिन केचिदपरे दिष्टं यज्ञं वदन्ति च ।
ब्रह्माग्निरेव यज्ञो वै इति केचन मेनिरे ।। 31 ।।
अर्थ- कोणी योगी शास्त्रांनी सांगितल्यानुसार यज्ञ करावा असे म्हणतात. तर ब्रह्मज्ञान हाच अग्नि ज्यामध्ये आहे तोही यज्ञच होय असे दुसऱ्या योग्यांचे मत आहे.
विवरण- आत्म्याचे परमात्म्याशी मिलन म्हणजे योग हे जाणून त्याप्रमाणे घडावं असं वाटणारा साधक योगी होण्याच्या वाटेवर असतो. ईश्वराने दिलेलं कार्य कसं करावं याबाबत योगी लोकांच्यामध्ये दोन प्रवाह आढळतात ते असे. निरपेक्षतेनं कर्म करणे हे यज्ञ करण्यासारखेच पवित्र कर्म असल्याने ते शास्त्राsक्त पद्धतीने करावे असे काही योग्यांचे मत आहे.
कोणतीही गोष्ट शास्त्रानुसार केली की ती यथायोग्य होते हे सर्वांना माहीत आहेच. तर काही असं समजतात की, कर्म कोणतं करायचं हे ज्या ईश्वराने नेमून दिलेलं आहे तोच ते कसं करावं म्हणजे यथायोग्य होईल ह्याचीही प्रेरणा देत असतो.
क्रमश: