अर्थव्यवस्थेला बळकटी देणारा रोजगाराभिमुख प्रकल्प: खंवटे
पणजी : चिंबल येथील प्रस्तावित युनिटी मॉल प्रकल्प हा अधिसूचित ओलित संवर्धन क्षेत्रात समाविष्ट नाही आणि ओलित संवर्धन क्षेत्रात या प्रकल्पाचे कोणतेही विकासकाम होणार नसल्याचे स्पष्ट आश्वासन पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी काल मंगळवारी विधानसभेत दिले. सांताक्रुझचे आमदार रुडॉल्फ फर्नांडिस यांनी लक्षवेधी सूचनेव्दारे विधानसभेत युनिटी मॉलचा मुद्दा उपस्थित केला होता. ओलित संवर्धन प्राधिकरणाने देखील हा प्रस्तावित प्रकल्प अधिसूचित ओलित संवर्धन क्षेत्राच्या कार्यकक्षेबाहेर असल्याचे लेखी कळविले आहे. पर्यावरणीय आणि आवश्यक ते सर्व नियम पाळले जातील. हा प्रकल्प प्रस्तावित राष्ट्रीय महामार्गाच्या लगत असला तरी, महामार्ग रुंदीकरणाचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे सांगून खंवटे यांनी प्रस्तावित मार्ग रुंदीकरण व घरांविषयी असलेल्या धोक्याबाबत उपस्थित केलेल्या मुद्याला उत्तर देताना त्यांनी स्पष्ट केले.
प्रस्तावित प्रकल्प हा स्थानिकांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण करणारा आहे. या प्रकल्पासाठी जी पाण्याची गरज भासणार आहे, त्यासाठी तेथील तलाव किंवा अन्य कोणत्याही स्थानिक जलाशयाचे पाणी वापरले जाणार नाही. पाणी पुरवठा विभागाकडून प्रकल्पासाठी लागणाऱ्या पाण्याची गरज पूर्ण केली जाईल. गोवा पर्यटन विकास महामंडळाने या प्रकल्पासाठी लागणारे सर्व परवाने आणि मंजुरी घेतल्या आहेत. त्यात ओलित संवर्धन प्राधिकरणाने दिलेल्या परवान्यासह, गोवा राज्य प्रदूषण महामंडळाचा परवाना तसेच कायदा व नियमानुसार लागणारे अन्य सर्व परवाने मिळविण्यात आले आहेत. युनिटी मॉल ही स्थानिक अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठीची केंद्राची योजना असून इतर राज्ये प्रकल्पासाठी पुढे जात असताना, केवळ गोव्यात विरोध का, असा प्रश्न पर्यटनमंत्री खंवटे यांनी विरोधकांच्या चर्चेला उत्तर देताना केला.
या प्रस्तावित मॉलला विरोध करणारे लोक आता साखळी उपोषणास बसले आहेत. तथापि, या लोकांनी आपल्या मुलांच्या भवितव्याचा विचार केला आहे का, असा प्रश्नही खंवटे यांनी उपस्थित करताना ते म्हणाले की, सरकार रोजगार पुरवू शकत नसल्याचा आरोपही हेच लोक करतात असा आरोपही त्यांनी केला. चिंबल येथील आयटी प्रकल्पालाही या लोकांनी विरोध केला. त्यावेळी सरकारनेही त्यांची बाजू ऐकली व प्रकल्प रद्द केला. कारण, त्या प्रकल्पात केवळ कुशल रोजगार पुरविण्याची क्षमता होती. मात्र आताचा युनिटी मॉल हा केवळ कुशल नव्हे तर अकुशल रोजगार पुरविणारा आहे, असे खंवटे यांनी स्पष्ट केले. चार मजली इमारतीचा हा प्रकल्प सुमारे 20 हजार 800 चौरस मीटर जागेत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यात केवळ 4 हजार चौरस मीटर जागेत प्रत्यक्ष बांधकाम असल्याचे ते म्हणाले. युनिटी मॉल शेजारी इतर खाजगी वसाहत प्रकल्प आल्यावेळी सरकारच्या प्रकल्पांना विरोध करणाऱ्यांना तेथे तोयार तलाव असल्याची जाणीव नव्हती का, असा खोचक सवालही खंवटे यांनी केला. प्रभाव क्षेत्र हे 250 मीटर असून हा प्रकल्प त्या निर्धारित मर्यादेबाहेर असल्याचेही स्पष्टीकरण खंवटे यांनी दिले.