सांकवाळमधील शाळेत बॉम्ब ठेवल्याच्या ई-मेलमुळे खळबळ
वास्को : सांकवाळ झुआरीनगर भागातील माऊंट लिटरा झी स्कुलमध्ये बॉम्ब ठेवण्यात आल्याचे वृत्त पसरल्याने खळबळ निर्माण झाली. शाळेतील मुलांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. सुरक्षा यंत्रणांनीही धावपळ केली. मात्र, बॉम्ब काही हाती लागला नाही. त्यामुळे अज्ञात व्यक्तीने पसरवलेले बॉम्ब ठेवण्यात आल्याचे वृत्त खोटेच असल्याचे उघडकीस आले. माऊंट लिटरा झी या सांकवाळमधील प्रसिध्द शाळेत सकाळी नऊच्या सुमारास ही बातमी येऊन धडकली. या शाळेला एक ई-मेल आला होता. त्यात शाळेत बॉम्ब ठेवण्यात आल्याचे नमूद करण्यात आले होते. त्यामुळे शाळेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. शाळेच्या मुख्याध्यापिकेने त्वरित पोलिसांना माहिती दिली.
पोलिसांनी ही माहिती गोव्याच्या बॉम्ब निकामी करणाऱ्या पथकाला दिली. शाळेने त्वरित सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या मैदानावर सुरक्षित ठिकाणी आणले. पालकांनाही या घटनेची माहिती देण्यात आल्याने बरेच पालकही दाखल झाले. त्यानंतर शाळाच अर्ध्यावर सोडण्यात आली. पोलिस, अग्निशामक दल व बॉम्ब निकामी करणारे पथक बचाव कार्याला लागले. शाळेतील सर्व वर्ग खोल्या व इतर ठिकाणी शोध घेण्यात आला. मात्र, बॉम्ब किंवा कोणतीही विस्फोट वस्तू पथकाच्या हाती लागली नाही. त्यामुळे अज्ञाताने पाठवलेला ई-मेल खोटा होता हे स्पष्ट झाले. या खोट्या माहितीमुळे शाळा व्यवस्थापन, विद्यार्थी, पालक व सुरक्षा यंत्रणांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. या घटनेचा तपास वेर्णा पोलिस करीत आहेत.