For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भरदिवसा रुमेवाडीत हत्तीचा धुमाकूळ

11:33 AM Sep 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
भरदिवसा रुमेवाडीत हत्तीचा धुमाकूळ
Advertisement

वनखात्याच्या प्रयत्नामुळे हत्तीला नंदगड जंगलात हुसकावण्यात यश : भात-ऊस पिकांचे हत्तीकडून मोठे नुकसान

Advertisement

खानापूर : खानापूर शहराला लागूनच असलेल्या रुमेवाडी येथे ऐन गणेशोत्सवातच मंगळवारी हत्तीचे आगमन झाल्याने नागरिकांची आणि वनखात्याची एकच तारांबळ उडाली. दुपारी 3 च्या दरम्यान असोग्याहून मणतुर्गेमार्गे रुमेवाडीत हत्ती दाखल झाला. गावच्या मागील बाजूस घरांना लागून असलेल्या शेतवडीत हत्तीने ऊस आणि भातपिकात धुडगूस घातला होता. अथक प्रयत्नानंतर हत्तीला नंदगडमार्गे नागरगाळीच्या जंगलात घालवण्यात वनखात्याला यश आले. गेल्या चार महिन्यांपासून अबनाळी, निलावडे, असोगा भागात या हत्तीने धुमाकूळ घातला होता.

मे महिन्यापासून निलावडे ग्रा. पं. क्षेत्रातील गावात धुडगूस घालत असलेल्या हत्तीचे चार दिवसांपूर्वी असोगा येथे आगमन झाले होते. हाच हत्ती मंगळवारी दुपारी 3 च्या दरम्यान असोग्याहून मणतुर्गा जंगलातून अचानक शहराला लागून असलेल्या रुमेवाडीत दाखल झाला. रुमेवाडी गावात घरांच्या मागील बाजूला असलेल्या शेतवडीत हत्ती आल्याचे काही नागरिकांच्या निदर्शनास आल्यानंतर एकच खळबळ उडाली. लोकांनी घरांच्या छतावरून हत्तीला पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती. याबाबतची माहिती खानापूर वनखात्याला देण्यात आली. वनखात्याचे कर्मचारी तातडीने रुमेवाडी येथे दाखल झाले.

Advertisement

खानापूर विभागाच्या वनाधिकारी सुनीता निंबरगी यांच्या नेतृत्वाखाली वनखात्याचे कर्मचारी हत्तीच्या हालचालीवर लक्ष ठेवून होते. हत्ती खानापूर, हेम्माडगा रस्त्याच्या पलीकडे येणार नाही, याची खबरदारी घेण्यात आली. त्यानंतर निंबरगी यांनी नंदगड, लोंढा, तसेच हेम्माडगा येथील भीमगड अभयारण्याच्या वनखात्याच्या कर्मचाऱ्यांना पाचारण केले. त्यानंतर हत्तीला जंगलात घालवण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले. हत्ती खानापूर-नंदगड रस्त्यावर तसेच गोवा रस्त्यावर येणार नाही, यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वन कर्मचाऱ्यांची पथके तैनात केली होती. मंगळवारी रात्रभर वन कर्मचारी यासाठी प्रयत्न करत होते. बुधवारी दुपारी 3 नंतर हत्तीला नंदगडच्या जंगलात घालवण्यात वनखात्याला यश आले.

दांडेली जंगलात गेल्यास तो आपल्या कळपात सामील होईल!

याबाबत वनाधिकारी सुनीता निंबरगी म्हणाल्या, हत्ती वयाने लहान असल्याने तो गेल्या सहा महिन्यांपासून कळपातून सुटून बाहेर आला आहे. त्यामुळे तो बिथरलेला आहे. गेल्या सहा महिन्यांपासून निलावडे परिसरात होता. आम्ही या हत्तीला जंगलात घालवण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत होतो. मात्र वयाने कमी असल्याने तो जंगलात जात नव्हता. गेल्या चार दिवसांपूर्वी हत्ती असोगा येथे आला होता. त्याचवेळी आम्ही या हत्तीला दांडेली जंगलात घालवण्यासाठी नियोजन केले होते. मात्र गणपती विसर्जन असल्याने ही मोहीम बुधवारी किंवा गुरुवारी हाती घेणार होतो. हत्ती रुमेवाडीत दाखल झाल्याने नंदगड जंगलात घालवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. या हत्तीच्या मागावर वनखात्याचे निरीक्षण असून नागरगाळी मार्गे दांडेली जंगलात घालवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. दांडेली जंगलात हा हत्ती गेल्यास तो आपल्या कळपात सामील होईल, अशी अपेक्षा आहे.

रुमेवाडी येथील शेतकऱ्यांचे नुकसान

रुमेवाडी येथील राजू गुंडपीकर, परशराम गावडे, गणेश बेडरे, जोतिबा चौगुले, नागेश बेडरे, परशराम बेडरे, सुराप्पा चौगुले, मल्हारी चौगुले, तानाजी चौगुले, जोतिबा बेडरे, देवाप्पा पाणेरी, आप्पाजी चौगुले, शंकर चौगुले, प्रल्हाद पाटील, विजय मिराशी या शेतकऱ्यांच्या भात आणि ऊस पिकांचे हत्तीने मोठे नुकसान केले आहे. याबाबत पंचनामा करून नुकसानभरपाई देण्यात येणार असल्याचे वनखात्याकडून सांगण्यात आले.

Advertisement
Tags :

.