सर्वेक्षणासाठी गेलेल्या शिक्षकावर हत्तीचा हल्ल्याचा प्रयत्न
बेंगळूर : राज्यात 22 सप्टेंबरपासून सामाजिक आणि शैक्षणिक सर्वेक्षण (जातनिहाय गणती) सुरू आहे. बुधवारी सर्वेक्षणासाठी दुचाकीवरून गेलेल्या कोडगू येथील शिक्षकावर हत्तीने हल्ल्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. सुदैवाने शिक्षकाने दुचाकी वाटेतच सोडून पळ काढल्याने तो बचावला. कोडगू जिल्ह्याच्या विराजपेठ तालुक्यातील मालदारे गावात ही घटना घडली आहे. गोणिकोप्पलू येथील माध्यमिक शाळेतील शिक्षक शिवराम हे बुधवारी सकाळी सामाजिक व शैक्षणिक सर्वेक्षणासाठी अवरेगुंड वनभागातून मालदारे गावाकडे निघाले होते. गावातील दुबारे आदिवासी भागात सर्वेक्षणासाठी त्यांची नेमणूक करण्यात आली होती. दुचाकीवरून जात असताना शिवराम यांच्यावर टस्कराने हल्ल्याचा प्रयत्न केला. बचाव करण्याच्या प्रयत्नात ते दुचाकीवरून खाली पडले. त्यांच्या पायाला दुखापत झाली. तशाच अवस्थेत त्यांनी दुचाकी तेथेच सोडून पळ काढला. त्यांनी ग्रामस्थांना याविषयी माहिती दिली. शिवराम यांना तातडीने इस्पितळात दाखल करण्यात आले. तहसीलदार प्रवीणकुमार यांनी इस्पितळाला भेट देऊन शिवराम यांची विचारपूस केली.