For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भरधाव ट्रक धडकल्याने दुचाकीवरील वृद्धेचा मृत्यू

02:46 PM Jun 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
भरधाव ट्रक धडकल्याने दुचाकीवरील वृद्धेचा मृत्यू
Advertisement

उद्यमबागमध्ये दहा दिवसात दुसरा बळी

Advertisement

बेळगाव : भरधाव ट्रक दुचाकीला घासून गेल्याने बेळगाव-खानापूर रोडवरील बेम्को क्रॉसजवळ बुधवारी सायंकाळी झालेल्या अपघातात खादरवाडी येथील वृद्धेचा मृत्यू झाला. तर वृद्ध जखमी झाला. खरेदीसाठी बेळगावला येताना हा अपघात घडला आहे. उद्यमबाग परिसरात अपघातात गेल्या दहा दिवसांतील हा दुसरा बळी आहे. पल्लवी परशराम मदली (वय 65) रा. देवेंद्रनगर-खादरवाडी असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दुर्दैवी वृद्धेचे नाव आहे. परशराम विठ्ठल मदली (वय 65) हे जखमी झाले असून त्यांच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत. घटनेची माहिती समजताच वाहतूक दक्षिणचे पोलीस निरीक्षक विनायक बडीगेर व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पल्लवी यांच्या पश्चात पती, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. पल्लवी व परशराम हे वृद्ध दाम्पत्य दुचाकीवरून खरेदीसाठी बेळगावला येत होते. बेम्को

क्रॉसजवळील बालाजी वे ब्रिजसमोर भरधाव ट्रक दुचाकीला घासून गेली. त्यामुळे हे वृद्ध दाम्पत्य दुचाकीवरून पडले. पल्लवी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलला हलवण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला. ओव्हरटेक करण्याच्या भरात ट्रक दुचाकीला घासून गेल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. या अपघातानंतर पल्लवी व परशराम हे दोघे वेगवेगळ्या दिशेला फेकले गेले. घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली होती. रात्री उशिरापर्यंत सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात उत्तरीय तपासणीची प्रक्रिया सुरू होती. वाहतूक दक्षिण विभाग पोलीस पुढील तपास करीत आहेत. दि. 8 जून रोजी दुपारी भरधाव ट्रकने दुचाकीला ठोकरल्याने फ्रान्सिस मुरगेश अँथोनी (अनुराग वेरेकर) (वय 69) रा. जोशी गल्ली, शहापूर या वृद्धाचा मृत्यू झाला होता. नातीला शाळेतून घरी नेताना हा अपघात घडला होता. याच परिसरात दहा दिवसात बुधवारी दुपारी घटना घडली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.