For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

टूथपिकद्वारे 17 फूट उंच आयफेल टॉवर

06:43 AM Jan 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
टूथपिकद्वारे 17 फूट उंच आयफेल टॉवर
Advertisement

एका युवकाने अनोखा विश्वविक्रम स्वत:च्या नावावर केला आहे. या युवकाने फ्रान्सच्या आयफेल टॉवरची नक्कल केली आहे. त्याने ही कामगिरी विट-दगडांनी नव्हे तर टूथपिकचा वापर करत केली आहे. अमेरिकेच्या या युवकाने स्वत:च्या अनोख्या प्रतिभेद्वारे जगाला अवाक् केले आहे.

Advertisement

या अनोख्या कामगिरीसोबत त्याने गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्वत:चे नाव नोंदविले आहे. या युवकाचे नाव एरिक क्लेबल असून तो अमेरिकेच्या इलिनॉय प्रांतात राहणारा आहे. एरिकने टूथपिक आणि गोंदच्या मदतीने 17.32 फूट उंच आयफेल टॉवर तयार केला आहे. टूथपिकने साकारलेली ही आतापर्यंतची सर्वात उंच संरचना ठरली आहे.

बालपणापासूनच मला गोष्टी साकारण्याचा छंद राहिला आहे. यामागे माझी सर्वात मोठी प्रेरणा पिता असून ते पेशाने सिव्हिल इंजिनियर आहेत. लहानपणी मी आइस्क्रीम स्टीकद्वारे गोष्टी तयार करायचो, असे एरिक सांगतो. एरिकने यापूर्वी 2021 मध्ये पॉप्सिकल स्टिकद्वारे 20 फूट उंच टॉवर साकारला होता. त्यावेळी देखील त्याने गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड स्वत:च्या नावावर केला होता. आता टूथपिकने आयफेल टॉवर तयार करत त्याने आणखी एक विक्रम साध्य केला आहे.

Advertisement

टूथपिकद्वारे काम करणे पॉप्सिकल स्टिकच्या तुलनेत अधिक अवघड आहे. टूथपिक अत्यंत छोटे असते, त्यांना जोडणे, संतुलन साधणे आणि मजबुती देणे अत्यंत आव्हानात्मक होते. तरीही केवळ टूथपिक आणि गोंदचा वापर करत हा टॉवर साकारला असल्याचे त्याने सांगितले.

Advertisement
Tags :

.