पुणे येथील उद्योजकाची कारवारमध्ये भीषण हत्या
हणकोण येथे अज्ञातांकडून प्राणघातक हल्ला : पत्नीही हल्ल्यात गंभीर जखमी : कारमधून आलेले हल्लेखोर पसार
कारवार : पुणे येथील उद्योजक विनायक ऊर्फ राजू काशीनाथ नाईक (वय 52) यांच़ी त्यांच्या मूळगाव असलेल्या कारवार तालुक्यातील हणकोण येथे सुरा, तलवार आणि लोखंडी रॉडने भीषण हत्या करण्यात आली. अज्ञातांनी केलेल्या प्राणघातक हल्ल्यात विनायक नाईक यांची पत्नी वृषाली गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना उपचारासाठी येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्या जीवावरील धोका टळला आहे. ही घटना रविवारी सकाळी साडेपाच ते सहाच्या दरम्यान घडली आहे, अशी माहिती कारवार जिल्हा पोलीसप्रमुख एम. नारायण यांनी दिली आहे. या घटनेने हणकोण परिसर हादरून गेला असून, कारवार तालुक्यात खळबळ माजली आहे.
16 तारखेला उत्सवाची सांगता झाली तरी शनिवार दि. 21 रोजी आपल्या मातोश्रीच्या श्राद्धाचे कार्य पार पाडण्यासाठी त्यानी हणकोण येथील मुक्काम पुढे ढकलला होता. श्राद्धाचे कार्य पार पाडल्यानंतर रविवारी सकाळी 6 वाजता पुण्याला निघणार होते. सकाळी विनायक नाईक आपल्या बॅगा कारमध्ये घालताना त्यांच्यावर सुरा, लोखंडी रॉड आणि तलवारीने हल्ला चालविला. त्यामुळे ते घरातच रक्ताच्या थारोळ्यात कोसळले आणि जागीच त्याचा मृत्यू झाला. स्वच्छता गृहात असलेल्या त्यांच्या पत्नी त्यांना वाचविण्यासाठी धावून आल्या तथापि त्यांच्यावरही अज्ञातांनी प्राणघातक हल्ला केला. वृषाली यांच्या डोक्याला व हाता-पायाला गंभीर दुखापत झाली आहे. कारमधून आलेले हल्लेखोर हत्येनंतर पसार झाले.
जिल्हा पोलीसप्रमुखांची घटनास्थळी भेट
घटनेची माहिती मिळताच कारवार जिल्हा पोलीसप्रमुख एम. नारायण यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व माहिती घेतली. हल्लेखोर कोण होते? कुठून आले? व कशासाठी त्यांची हत्या करण्यात आली? हल्लेखोर कोणती भाषा बोलत होते? हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही. घटनास्थळी श्वानपथकाला पाचारण करण्यात आले होते. सातेरीदेवी परिसर आणि हणकोण येथील अन्य सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करण्यात आली. कारवारचे डीवायएसपी गिरीश यांच्या नेतृत्वाखाली चौकशी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. मयत नाईक यांचा मुलगा आदित्य हा अमेरिकेमध्ये एमएसचे शिक्षण घेत असून तो आल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, असे सांगण्यात आले. या घटनेमुळे हणकोण गावावर शोककळा पसरली आहे. सदाशिवगड पोलीस ठाण्यात या प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे.