गोलीहाळ्ळी येथे पार्श्वनाथची मूर्ती चोरीचा प्रयत्न विद्यार्थ्यांमुळे फसला
प्लॉट विक्री होत नसल्याने जमीन मालकाने मूर्तीच हलविण्याची लढविली नामी शक्कल
खानापूर : तालुक्यातील बिडी जवळील गोलीहाळ्ळी येथे उघड्यावर शेतात असलेली पार्श्वनाथची मूर्ती रविवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान काही जण वाहनातून चोरुन नेत असल्याची माहिती काही शाळकरी मुलांनी नागरिकांना दिली. त्यामुळे गोलीहाळ्ळी ग्रामस्थांनी रविवार रात्रीच नंदगड पोलीस स्थानकात मूर्ती चोरी झाल्याची माहिती दिली. नंदगड पोलिसांनी त्वरित मूर्ती चोरणाऱ्याला ताब्यात घेऊन मूर्ती नंदगड पोलीस स्थानकात आणली. गोलीहाळ्ळी येथील गावठाणात पार्श्वनाथची मूर्ती शेकडो वर्षापासून आहे. ग्रामस्थ सर्व सण, उत्सव आणि धार्मिक कार्यक्रम मूर्तीची पूजा करूनच करण्याची प्रथा आहे. त्यामुळे गोलीहाळ्ळी येथील ग्रामस्थांचे धार्मिक आणि भावनिक नाते या मूर्तीशी आहे. जमीन मालकाने या जमिनीत प्लॉट पाडून विकण्याचा घाट घातला होता मात्र तेथे मूर्ती असल्यामुळे प्लॉट विक्री होत नसल्याचे समजल्यानंतर तिथून मूर्तीच हलवण्याचा प्रयत्न मालकाकडून करण्यात आला आहे.
पोलीस ठाण्यासमोर ग्रामस्थांचे ठिय्या आंदोलन
गोलीहाळ्ळी ग्रामस्थांनी सोमवारी सकाळी नंदगड पोलीस स्थानकासमोर ठिय्या आंदोलन करून जोपर्यंत मूर्ती चोरणाऱ्यावर गुन्हा दाखल होत नाही आणि मूर्तीची पुन्हा प्रतिष्ठापना होत नाही, तोपर्यंत आम्ही येथून हलणार नाही अशी भूमिका घेतली आहे. सोमवारी रात्री उशिरापर्यंत ग्रामस्थ नंदगड पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू होते. याबाबत पोलिसांनीही अधिक माहिती देण्यास नकार दिला असून, मूर्ती मात्र ताब्यात घेतली असल्याचे सांगितले.