For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

निवडणुकीत ‘मॅच फिक्सिंग’चा प्रयत्न!

06:58 AM Apr 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
निवडणुकीत ‘मॅच फिक्सिंग’चा प्रयत्न
Advertisement

लोकशाही वाचवा रॅली’त राहुल गांधींचा हल्लाबोल : ‘इंडिया’च्या दोन खेळाडूंना तुरुंगात डांबल्याचा दावा

Advertisement

► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

दिल्लीतील इंडिया ब्लॉक रॅलीत कार्यकर्त्यांना संबोधित करताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर हल्लाबोल केला. ‘तुम्ही मॅच फिक्सिंग हा शब्द ऐकला आहे का? पंचांवर दबाव आणला जातो, खेळाडू विकत घेतले जातात, कर्णधारांना सामना जिंकण्याची धमकी दिली जाते,’ असे सांगत सध्याच्या लोकसभा निवडणुकीतही राजकीय फिक्सिंग सुरू असल्याचा दावा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला. तसेच ईव्हीएम आणि मॅच फिक्सिंगशिवाय पंतप्रधान 180 जागा पार करू शकणार नाहीत, असेही ते पुढे म्हणाले.

Advertisement

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ रविवारी दिल्लीतील रामलीला मैदानावर ‘इंडिया’ आघाडीचे नेते एकत्र आले होते. झारखंडचे मुख्यमंत्री चंपाई सोरेन, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार, शिवसेना (युबीटी) नेते उद्धव ठाकरे, आरजेडी नेते तेजस्वी यादव, सीपीआय (एम) सरचिटणीस सीताराम येचुरी, सीपीआयचे सरचिटणीस डी. राजा, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूक अब्दुल्ला, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, द्रमुकचे तिऊची शिवा, टीएमसीचे डेरेक ओब्रायन आणि इतर नेते या रॅलीला उपस्थित होते.

केंद्र सरकारवर निशाणा साधत राहुल गांधी यांनी आयपीएलचा हवाला देत केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. मॅच फिक्सिंग करून सामने कसे जिंकले जातात, हे त्यांनी सविस्तर सांगितले. लोकसभा निवडणुका समोर असताना नरेंद्र मोदींनी आमचे दोन खेळाडू अरविंद केजरीवाल आणि हेमंत सोरेन यांना अटक केली. विरोधकांवरील अशा प्रकारच्या कारवाईतून नरेंद्र मोदीजी मॅच फिक्सिंग करण्याचा प्रयत्न करत आहेत, असे राहुल गांधी म्हणाले.

लोकसभा निवडणुकीत भाजपचे नेते 400 पारचा नारा देत आहेत. मात्र,  फिक्ंिसगशिवाय, सोशल मीडिया विकत घेतल्याशिवाय किंवा दबाव आणल्याशिवाय भाजप 180 चा आकडा पार करू शकणार नाही, असेही ते पुढे म्हणाले. नेत्यांना धमक्मया दिल्या जातात, पैसे देऊन नेते विकत घेतले जातात. हे फिक्सिंग पंतप्रधान मोदीच नाही तर देशातील तीन-चार बड्या कॉर्पोरेट्स करत असल्याचा हल्लाबोलही त्यांनी केला. पोलीस, सीबीआय, ईडीच्या मदतीने नेत्यांना धमकावण्याचे काम केले जात आहे, मात्र जनतेचा आवाज तुम्ही दाबू शकत नाही. काँग्रेस नेते राहुल यांनी नोटाबंदी आणि जीएसटीवरही प्रश्न उपस्थित केले आहेत.

प्राप्तिकरच्या कारवाईबाबतही भाष्य

काँग्रेस पक्षाची बँक खाती जप्त करण्याच्या मुद्यावर राहुल गांधी यांनी मंचावरून काँग्रेस हा विरोधी पक्षांचा सर्वात मोठा पक्ष असल्याचे सांगितले. आमची सर्व बँक खाती बंद करण्यात आली आहेत. निवडणुकीच्या तोंडावर बँक खाती बंद करण्यात आली आहेत. पैसे देऊन सरकार खाली आणले जात आहे. ज्या दिवशी राज्यघटना संपेल त्या दिवशी भारत टिकणार नाही, असे ते म्हणाले. कर्नाटकचे भाजप खासदार अनंतकुमार हेगडे यांच्या विधानाचा संदर्भ देत राहुल गांधी म्हणाले की, ‘त्यांचे खासदार आम्ही 400 जागा जिंकताच संविधान बदलू’ची भाषा करतात. मात्र, संविधान हा भारतीय जनतेचा आवाज आहे. तुम्ही भारताचा आवाज दाबू शकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

देश वाचविण्यासाठी एकत्र : खर्गे

मोदींची विचारधारा दूर केल्याशिवाय सुख-समृद्धी येणार नाही. संविधान असेल तर तुम्हाला तुमचे मूलभूत अधिकार मिळतील. नेहरूजी आणि बाबासाहेबांनी मिळून प्रत्येक व्यक्तीला हक्क दिला. स्त्री असो वा पुऊष, प्रत्येकाला हक्क मिळाला. इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनी देशाला एकसंध ठेवण्यासाठी आपले प्राण दिले. आज देश वाचवण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र आलो आहोत, असे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले. प्राप्तिकर विभागाच्या नोटिसांवरूनही त्यांनी केंद्र सरकारला धारेवर धरले.

टीएमसी पूर्णपणे इंडिया आघाडीसोबत : सागरिका घोष

केजरीवाल आणि आम आदमी पार्टीला ममताजींचा पूर्ण पाठिंबा आहे. त्या पूर्णपणे इंडिया आघाडीत समाविष्ट आहेत, असे टीएमसी खासदार सागरिका घोष यांनी सांगितले. हा लढा हुकूमशाहीविऊद्ध आहे. सध्या देशात लोकशाही नाही तर हुकूमशाही आहे. विरोधकांना चिरडण्याचे काम ईडी करत आहे, असेही त्यांनी सांगितले. आज देशात अघोषित आणीबाणी लागू करण्यात आली आहे. देशात महागाई आणि बेरोजगारी वाढत असताना मोदीजींचे लक्ष ईडी, सीबीआय आणि आयटीकडे असल्याचे तेजस्वी यादव म्हणाले.

सुनीता यांनी वाचला अरविंद केजरीवालांचा संदेश

रामलीला मैदानावर केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल विरोधी पक्षाच्या नेत्यांसोबत मंचावर उपस्थित होत्या. त्यांनी मुख्यमंत्री केजरीवाल यांचा संदेश वाचून दाखविला. याप्रसंगी त्यांनी लोकशाहीचे महत्त्व विषद करण्यासोबतच केजरीवाल हे खरे देशभक्त माणूस असल्याचा दावा करत आज ते देशासाठी लढत आहेत, असे स्पष्ट केले. पंतप्रधान मोदीजी यांनी माझ्या पतीला तुऊंगात टाकले. पंतप्रधानांनी योग्य काम केले का? केजरीवालजी हे खरे देशभक्त आणि प्रामाणिक व्यक्ती आहेत यावर तुमचा विश्वास आहे का? असे प्रश्नही उपस्थित केले.

Advertisement
Tags :

.