दिवाळीत बाजारात उत्साहाचे वातावरण
सेन्सेक्स 364 तर निफ्टी 127 अंकांनी मजबूत
मुंबई :
बीएसई सेन्सेक्समध्ये 364 अंकांची वाढ झाल्याने स्थानिक शेअर बाजारातील तेजीचा सिलसिला मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशीही कायम राहिल्याचे दिसून आले. जागतिक बाजारातील मजबूत ट्रेंड दरम्यान व्यवहार संपण्यापूर्वी गुंतवणूकदारांनी बँक समभागांमध्ये खरेदी केल्याने बाजारात तेजी आली.
दिवसाच्या सत्रात बाजारात चढ उतार दिसून आला. दिग्गज कंपन्यांच्या मदतीने दिवसअखेर सेन्सेक्स 363.99 अंकांनी वधारुन निर्देशांक 0.45 टक्क्यांसह 80,369.03 वर बंद झाला. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीदेखील 127.70 अंकांच्या वाढीसह 24,466.85 वर बंद झाला.
तेजीचे कारण?
व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी केलेल्या खरेदीमुळे बाजाराला चालना मिळाली आहे. सेन्सेक्समधील 30 समभागांपैकी स्टेट बँक ऑफ इंडियाने बाजाराला मजबुत पाठिंबा दिला होता, बँकेचे समभाग पाच टक्के वाढले होते.
मुख्य कंपन्यांमध्ये मंगळवारी आयसीआयसीआय बँक, बजाज फिनसर्व्ह, एनटीपीसी, अदानी पोर्ट्स, बजाज फायनान्स आणि लार्सन अँड टुब्रो यांचे शेअर्स मोठ्या प्रमाणात वाढले. याउलट नुकसान झालेल्यांमध्ये मारुती, टाटा मोटर्स, सन फार्मा, भारती एअरटेल, इंडसइंड बँक आणि महिंद्रा अँड महिंद्रा यांचा समावेश आहे.
विदेशी गुंतवणूकदार समभाग विकत आहेत, देशी गुंतवणूकदार खरेदी करत आहेत असे काहीसे चित्र बाजारात दिसते आहे. शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार, विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी सोमवारी 3,228.08 कोटी रुपयांचे शेअर्स विकले तर डीआयआय (देशांतर्गत गुंतवणूकदार) ने 1,400.85 कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले.
जागतिक बाजारात तेजी
इतर आशियाई बाजारांमध्ये दक्षिण कोरियाचा कोस्पी, जपानचा निक्की आणि हाँगकाँगचा हँगसेंग वधारला तर चीनचा शांघाय कंपोझिट तोट्यात होता. प्रमुख युरोपियन बाजार तेजीत राहिले. सोमवारी अमेरिकन बाजार तेजीत होते.