जीवनशिक्षणाचा धडा देणारी मुंगी
मुंग्या आणि पूर्वज स्त्रिया यांचे एकेकाळी जिव्हाळ्याचे नाते होते. ‘स्वयंपाकघर’ या स्वत:च्या हक्काच्या विश्वात रमणाऱ्या स्त्रियांना मुंग्यांची फार धास्ती असायची. गोड पदार्थांना, अन्नाला, बेगमीच्या पदार्थांना मुंग्या लागू नयेत म्हणून त्या काळजी घेत. अन्न पाण्यात ठेवा, हळदपूड टाका, लवंगाची पूड ठेवा असे उद्योग त्या करायच्या. मात्र मुंग्यांना मारून टाकावे असा विचार काही त्यांच्या मनात आला नाही. उलट देवदर्शन करून येताना एखाद्या झाडाच्या बुंध्याशी त्या मुद्दाम काळ्या मुंग्यांसाठी साखर ठेवीत. कारण काळी मुंगी देवाघरचा जीव असतो. मुंगी किती चिमुकला जीव! परंतु माणसाच्या जगण्यात आणि अध्यात्मात तिने आपला ठसा ठळकपणे उमटवला आहे.
असे म्हणतात की मुंगीपासून ब्रह्मांडापर्यंत प्रत्येक जिवाचे या जगात प्रयोजन आहे. संतश्रेष्ठ ज्ञानोबा माऊली म्हणतात,
‘अगा दमियांमाझारी। अनिवार दंडू तो मी अवधारी। जो मुंगियेलागोनी
ब्रह्मावेरी। नियमित पाळे’ ‘अर्जुना, नियमन करणाऱ्यांमध्ये जे मुंगीपासून ब्रह्मदेवांपर्यंत सर्वांचे सारखे नियमन करते ते अनिवार्य शासन ही माझी विभूती आहे असे समज.’
मुंगी हा सृष्टीसाखळीतला एक महत्त्वाचा घटक असल्यामुळे पूर्वजांनी तिला माणसाच्या भाषेत, जगण्यात आणून बसवले. लहानगी मुंगी एवढी धीट असते की खुशाल साडेपाच-सहा फुटी माणसाच्या अंगावर चढून त्याला चावा घेते. तिला भीती म्हणून वाटत नाही. पूर्वी मातीची घरे असत. ठिकठिकाणी माती उकरून मुंग्या आपली घरे बांधत. ती छोटी वारुळे मोडायची कुणाची हिंमत नव्हती. कारण मुंगीचा धाक. मुंग्या जर समूहाने अंगावर चढल्या तर चावल्याशिवाय उतरत नाहीत. एखाद्या विषारी सापावर देखील चढाई करून त्या त्याला यमसदनाला पाठवतात. मुंग्यांची लुडबुड भाषेत भरपूर आहे. मुंगीचे पाऊल कुणी बरे बघितले आहे? परंतु भाषेत ते सारखे डोकावते. मुंगीच्या पावलांनी येणेजाणे हा वाक्प्रचार सवयीचा आहे. सावकाश, हळूहळू चालणारे पाऊल हमखास मुंगीचे असते. एखादे आजारपण किंवा संकट येताना तर गतीने येते, मात्र जाताना वेळ लागतो. तेव्हा त्याला मुंगीच्या पावलाची उपमा देतात. संत कबीर म्हणतात की मुंगीच्या पायात बांधलेल्या घुंगराचा आवाज परमात्म्याला ऐकू येतो, तर ज्ञानोबा माऊली म्हणतात, एखादा योगी पुरुष सागराच्या पलीकडले पाहतो, स्वर्गातले बोलणे ऐकतो आणि मुंगीच्या मनात काय आहे तेही जाणतो. ‘मनोगत ओळखे मुंगियेचे’ याचा अर्थ मुंगीलाही मन असते. मुंगी होऊन साखर खावी पण हत्ती होऊन लाकडाचे ओझे वाहू नये, अशी एक म्हण आहे. नम्रतेने, गोड बोलून स्वत:चा लाभ करून घ्यावा. उगीच गर्वाने वागून कष्ट का उपसावे असा त्याचा भावार्थ आहे. हत्ती बलाढ्या आणि मुंगी लहान म्हणून यांची जोडी भाषेत मिरवत असते. मुंगी खाते साखर आणि हत्ती खातो अंकुशाचा मार. मातीत मिसळलेली साखर मुंगी खाऊ शकते. हत्तीला ते जमणे शक्य नाही.
संत तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे-
‘लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा । ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार । जया अंगी मोठेपण तया यातना कठीण । तुका म्हणे जाण । व्हावे लहानाहून लहान?’
मुंगी चिमुकली असली तरी तिला साखर खायला मिळते. हत्ती हे रत्न असूनही त्याला अंकुशाचा मार मिळतो. ज्याच्या अंगी मोठेपणा असतो त्याला यातना सोसाव्या लागतात. म्हणून लहानांपेक्षा लहान म्हणजे मुंगीसारखे व्हावे.
संत मुक्ताबाईंचा एक अभंग आहे-
मुंगी उडाली आकाशी, तिने गिळिले सूर्याशी.
हा अभंग गूढ आहे. या अभंगाचा अर्थ पू. मामा देशपांडे यांच्या परमशिष्या शकुंतलाताई आगटे यांनी सांगितला आहे. त्या म्हणतात, मुंगी म्हणजे भगवती शक्ती शरीरामध्ये मुलाधारात अधोमुखी असते. मुंगी ज्याप्रमाणे कधीही स्वस्थ बसत नाही, झोपत नाही, सतत काही ना काहीतरी ने-आण करत असते त्याप्रमाणे भगवती शक्ती देखील अखंड काम करीत असते. माणसाच्या शरीरात असणारी अधोमुखी मुंगीरूप शक्ती शरीराचा कारखाना गुप्तरूपाने चालवते. ती जर जागृत झाली तर ती चिदाकाशात जिथे भगवंत असतात तिथे जाते. अधोमुखी शक्ती ऊर्ध्वमुखी झाली की ती अहंकाराला संपवते. साधकाच्या मनात प्रेमाचा उदय होतो, त्याच्या प्रापंचिक वृत्ती कमी होऊन मन स्थिर होते.
मुंगीचे दृष्टांत बरेच आहेत. एकदा एक मुंगी तोंडात मिठाचा खडा धरून साखरेच्या राशीवरून फिरून आली आणि म्हणाली, ‘छे बाई, सगळे खारटच आहे.’ माणूस प्रपंचाचा खारटपणा मनात धरून परमार्थाच्या राशीवरून फिरून येतो तेव्हा त्याला हाच अनुभव येतो. पुनर्जन्माची गोष्ट सांगताना रामकृष्ण परमहंस म्हणत, एकदा एक मुंगी साखरेच्या पहाडापाशी आली तेव्हा एक कण खाऊन तिचे पोट भरून गेले. तेव्हा ती म्हणाली, पुढच्या वेळी येईन तर सारा पहाडच उचलून नेईन. अक्कलकोटनिवासी स्वामीसमर्थ हे सेवेकरी भांडू लागले की त्यांच्या हातावर मुंगी ठेवत. याचा भावार्थ असा की मुंगी मौन पाळते आणि समूहात शांतपणे काम करते. तिचा हा गुण घ्यावा. जीवनशिक्षणाचा धडा देणारी मुंगी माणसाच्या मनावर कर्मयोगाचा संस्कार घडवते.
मुंग्यांची जीवनव्यवहाराची व्यवस्था अनोखी आहे. नर मुंगी हा लहान आणि नाजूक असतो. प्रजा निर्माण करणे एवढेच त्याचे काम असते. नंतर तो मरतो. मादी हजारोंच्या संख्येने अंडी घालते. अंडी उबवणे, पिल्लांचे संगोपन, त्यांची काळजी घेत जोपासना करणे ही सगळी कामे कामकरी मुंग्या करतात.
विदुषी दुर्गाबाई भागवतांना मुंगीचा पुनर्जन्म घ्यावासा वाटला. कारण वंध्या, नपुंसक मुंग्या अत्यंत जिव्हाळ्याने पिल्लांचे संगोपन करतात. वात्सल्य या सर्वोत्कृष्ट भावनेची कदर निसर्गामध्ये फक्त मुंग्या करतात. मुंग्या अतिशय संवेदनशील असतात. संकटात आपल्या सोबत्यांना सावध करीत मदत करतात. साठवण करतात.
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीत म्हणतात,
‘मुंगीपासून ब्रह्मांडापर्यंत मीच भरून उरलेलो आहे.’
अशा या मुंगीमधल्या परमात्म्याला प्रणाम.
-स्नेहा शिनखेडे